महाराष्ट्र सरकारकडून 3 टक्के कपात; उरलेले 2 टक्के विकसक देणार
मुंबई – नॅरेडको या विकसकांच्या संघटनेतील सदस्य विकसकांनी घर विक्री वाढविण्यासाठी ग्राहकांना शून्य टक्के मुद्रांक शुल्काचा प्रस्ताव पुढे केला असल्याचे वृत्त आहे. काही वृत्तमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार 3 सप्टेंबरपासून 31 ऑक्टोबरपर्यंत जे ग्राहक संबंधित सदस्य विकासकांची घरे खरेदी करतील, त्यांना या प्रस्तावाचा लाभ घेता येईल.
सध्याच्या परिस्थितीत घर विक्री वाढावी याकरिता महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन 31 डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्क पाच टक्क्यांवरून दोन टक्के केले आहेत. तर 31 मार्चपर्यंत पाच टक्क्यांवरून तीन टक्के केले आहे.
नॅरेडकोचे विकसक 31 ऑक्टोबरपर्यंत ग्राहकांच्या वतीने दोन टक्के मुद्रांक शुल्क देणार आहेत. विशेष म्हणजे सर्व प्रकल्प रेरा अंतर्गत नोंदण्यात आले आहेत. याअंतर्गत एक हजार घरांचे प्रकल्प उपलब्ध होणार असल्याचे नॅरेडकोने म्हटले आहे. नॅरेडकोच्या पश्चिम विभागाचे प्रमुख राजन बांदेलकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन टॅम्प ड्युटी तीन टक्क्यांनी कमी करून दोन टक्के केली आहे.
उरलेली दोन टक्के स्टॅम्प ड्युटी आमचे सदस्य विकसक देण्यास तयार आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात घर विक्री वाढेल अशी आम्हाला आशा आहे. उत्सवांच्या काळात कुंपणावर बसून असलेले ग्राहक या योजनेचा लाभ घेतील असे या संघटनेला वाटते. त्याचबरोबर पीहल्यांदाच घर घेणऱ्या तरुणांनाही ही सवलत आकर्षक वाटण्याची शक्यता आहे.
पुण्यातील ग्राहकांना लाभ होणार
नॅरेडकोचे सदस्य विकसक बऱ्याच प्रमाणात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक शहरांत आहेत. त्यामुळे या शहरातील नागरिकांना या विकसकांनी देऊ केलेल्या सवलतीचा लाभ होण्याची शक्यता आहे. या सवलतीच्या अंतर्गत लक्झरी घरांबरोबरच किफायतशीर घरांचाही समावेश करण्यात आलेला आहे. सध्या एक हजार गृह प्रकल्प या सवलतीच्या योजनेत समाविष्ट करण्यात आले असून आणखी काही विकसक आपल्या योजनासाठी ही सवलत लागू करण्याची शक्यता असल्याचे राजन बांदेलकर यांनी सांगितले.