नवी दिल्ली – हार्दिक पटेल यांनी बुधवारी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. अशातच हार्दिक पटेल यांच्या राजकीय पक्षात प्रवेशाबाबत विविध अंदाज बांधले जात आहेत. हार्दिक यांनी आतापर्यंत तो कोणत्या पक्षात जाणार यावर सस्पेन्स कायम ठेवला आहे. तर सोमवारी हार्दिक यांच्याशी ‘टीव्ही माध्यमांनी’ संवाद साधला असता त्यांनी अनेक खुलासे केले.
पत्रकरांनी हार्दिक यांना राजीनामा दिल्यानंतर कुटूंबाची आणि पत्नीची काय प्रतिक्रिया होती? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले,’ माझा निर्णयावर माझी पत्नी आणि कुटुंब खूप आनंदी आहे. कारण माझ्या पत्नीचे कुटुंब भाजपच्या विचारधारेशी वर्षानुवर्षे जोडलेले आहे. अशा परिस्थितीत जेव्हा मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तेव्हा माझ्या पत्नीचे कुटुंबीयही मला विचारायचे तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश ला घेतला? तसेच, माझे वडील हयात असताना म्हणायचे की, हार्दिकने चुकीच्या पक्षात प्रवेश केला आहे. पण आता राजीनाम्यानंतर कुटुंबात सर्वजण आनंदी आहेत.’
दरम्यान, पुढे हार्दिक यांना भाजपामध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता हार्दिक पटेल यांनी पुढील १० दिवसांत आपला निर्णय जाहीर करु, असेही सांगितले.
तीन वर्षांत काँग्रेस सोडली
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेलने 12 मार्च 2019 रोजी काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. त्यानंतर अवघ्या 19 महिन्यांच्या प्रवासात हार्दिक पटेल यांना गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष बनवण्यात आले. मात्र हार्दिक पटेल काँग्रेस हायकमांडसमोर आपल्या मागण्या मांडत राहिला. गुजरात काँग्रेसच्या नेत्यांनी आपली कारकीर्द खराब केल्याचा आरोपही हार्दिकने केला.