मुंबई – कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र यासाठी संभाजीराजे यांना इतर पक्षाचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. संभाजीराजे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर भेट घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या अपक्ष उमेदवारीसाठी शिवसेनेनं पाठिंबा द्यावा, अशी यावेळी विनंती केली आहे. या भेटीनंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.
संभाजीराजे म्हणाले, माझी मुख्यमंत्री उद्धवजींशी सविस्तर चर्चा झाली. सविस्तर बोलणं झालेलं आहे. पुढे काय करायचं ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील, मला हा ही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील असे वक्तव्य संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
दरम्यान, संभाजीराजेंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाबाबत आता पुन्हा राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. संभाजीराजे यांनी पाठिंबा मिळण्यासाठी इतरही पक्षांना त्यांनी विनंती केली आहे.