Congress : काँग्रेस (Congress) दिनानिमित्त ‘है तयार हम’ सभेचं आयोजन करण्यात आले आहे. आज 28 डिसेंबर रोजी ला नागपुरात काँग्रेसची ‘है तयार हम’ अशी महारॅली सभा होणार आहे. याकरिता जय्यत तयार करण्यात आली आहे. 1920 मध्ये काँग्रेसचे खास अधिवेशन नागपुरात पार पडले होते त्यानंतर 103 वर्षानंतर काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा नागपुरात होत आहे. हा विदर्भातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे मतही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
काँग्रेसच्या या सभेसाठी उमरेड रोडवरील बहादुरा परिसरात 40 एकर क्षेत्रावर विशेष मैदान तयार करण्यात आला आहे. सोनिया गांधी , राहुल गांधी, प्रियांका गांधी उपस्थित राहाणार आहेत. या कार्यक्रमाबाबत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, “सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे या राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला दिशा मिळेल. विदर्भाच्या भूमीने नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी आणि प्रभू श्रीरामाचा रामटेक या पावनभूमीतून आशीर्वाद घेऊन काँग्रेस नेतृत्व देशातून भाजप सरकारला उलथवून लावेल,” असा विश्वास देखील वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
सभेसाठी नागपूर निवडण्याचे कारण काय?
नागपूरशी काँग्रेसचा संबंध भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीचा आहे. डिसेंबर 1920 मध्ये झालेल्या काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली पक्षाने ब्रिटिशांविरुद्ध असहकार आंदोलन सुरू करण्याचे आवाहन केले होते. नागपूर हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. आणीबाणीच्या काळात समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील “इंदिरा हटाओ, देश वाचवा” आंदोलनातही काँग्रेसने नागपुरात आपली जागा कायम ठेवली होती. 1980 ते 2019 पर्यंत, भाजपने नागपूर लोकसभेची जागा 1996, 2014 आणि 2019 तीन वेळा जिंकली आहे.
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नेत्यांनी निर्माण केलेल्या संविधानाने साकारलेल्या ‘भारताच्या कल्पनेवर’ दावा करण्यासाठी भाजप-आरएसएससोबत वैचारिक लढाई सुरू असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.