हडपसर – हडपसर उड्डाणपूल वाहतुकीस धोकादायक झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पहाता पुलाची पहाणी करून तज्ञांनी सुचविलेल्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. पुण्याहून होणारी वाहतुक पुढील वीस दिवस तर सोलापूर, सासवडकडून होणारी वाहतुक सुमारे दिड महिने बंद राहणार आहे. नागरिकांची गैरसोय होते आहे. परंतु भविष्यात दुर्घटना घडू नये यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार चेतन तुपे यांनी केले असून, या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांची हडपसर क्षेत्रीय कार्यालयात आज बैठकीत घेऊन दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करावी ,तत्पुर्वी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असा सूचनाही आमदार तुपे यांनी यावेळी केल्या आहेत.
पूलाच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यापूर्वी वाहतूक व इतर गोष्टींच्या नियोजनासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे, परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, पालिकेच्या अधिक्षक अभियंता सुष्मिता शिर्के, कार्यकारी अभियंता इंद्रभान रणदिवे, सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर, हडपसर वाहतूक पोलीस निरिक्षक मनिषा झेंडे, पोलिस निरिक्षक अरविंद गोकुळे, नगरसेवक मारुतीआबा तुपे, योगेश ससाणे, संजय घुले, नगरसेविका वैशाली बनकर,नगरसेविका हेमलता मगर, माजी नगरसेवक सुनिल बनकर आदी उपस्थित होते.
पूलाच्या दुरुस्तीचे काम होईपर्यंत फुलाच्या तीनही बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. ही संपूर्ण वाहतूक पुलाखालून वळविण्यात आली आहे. आवश्यक सेवेतील जड वाहनांना रात्री दहानंतर सकाळी सहापर्यंत या मार्गावरून प्रवास करता येईल. गाडीतळ येथील चक्राकार मार्गासह पूलाच्या परिसरातील सर्व बंद व पोलिसांनी जप्त केलेली वाहने माळवाडी येथे हलविण्यात येतील. गाडीतळ येथील कालव्यावरील बस थांबा हटवून पुढे गांधी चौकाजवळ येणार आहे. काही पंक्चर बंद करण्यात येणार आहेत. कालव्यावरील रस्ते, कच्चे डीपी रस्ते वाहतुकीयोग्य करून त्यावरून वाहतूक होईल. पूलाखालील पथारी व्यवसाय हलवून तेथून वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.
हडपसर सावली कॉर्नर, गाडीतळ, रवी दर्शन, आकाशवाणी या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या खाजगी प्रवासी बसेस व इतर वाहने मत्स्य बीज केंद्रजवळ व त्या पुढे उभे राहतील. मुख्य मार्गावरील रिक्षा थांबे बंद राहतील. हिंगणे मळा कालव्या वरून वाहतूक केली जाईल. वाहतूक नियंत्रणासाठी पीएमपीएलचे कर्मचारीही पोलिसांना मदत करतील, असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत.