गुजरात: ओएनजीसी प्रकल्पाला भीषण आग

सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी नाही

नवी दिल्ली : गुजरातमधील ऑइल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्परेशनच्या (ओएनजीसी) प्रकल्पाला गुरुवारी रात्री अचानक भीषण आग लागली. येथील हाजिरामधील प्रकल्पाच्या ठिकाणी रात्री तीनच्या सुमारास तीन मोठे स्फोट झाले. दोन टर्मिनल्सवर झालेल्या या स्फोटानंतर मोठ्या आगीच्या ज्वाला अगदी दूरवरुनही दिसत होत्या. या संदर्भातील व्हिडिओ एका वृत्तसंस्थेने ट्विटवरुन पोस्ट केला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

एका वृत्तसंस्थेने या प्रकल्पाशी संबंधित असणाऱ्या डॉक्टर धवल पटेल यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, तीन वाजण्याच्या सुमारास प्रकल्पाच्या टर्मिनल्समध्ये लागोपाठ तीन मोठे स्फोट झाले. त्यानंतर येथील टर्मिनल दोनला आग लागली. या अपघातामध्ये कोणतीही जिवितहानी झाल्याचे प्रथमिक वृत्त हाती आलेले नाही. सध्या या प्रकल्पामध्ये साठवून ठेवण्यात आलेला नैसर्गिक गॅसचा साठा डिप्रेशराइज करण्याचे काम सुरु आहे असे पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

ओएनजीसीमध्ये झालेले हे स्फोट इतके भीषण होते की, दहा किलोमीटरपर्यंत ते ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. या ठिकाणी पहाटे चारपासूनच आग विझवण्याचे काम अग्निशामन दलाच्या जवानांकडून केले जात होते. तीन साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या अपघातामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नसून कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखापत झालेली नाही, असे ओएनजीसीने स्पष्ट केले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सध्या सुरु असल्याचे समजते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.