‘त्या’ इंजेक्‍शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी – अत्यवस्थ करोनाबाधित रुग्णांसाठी अत्यावश्‍यक मानल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर या इंजेक्‍शनचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी केल्या जात होत्या. परंतु कोणावरही कारवाई झाली नव्हती. एका रुग्णाच्या नातेवाइकाने पुढे येत याबाबत तक्रार केल्याने तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औषध विक्रीचा परवाना नसतानाही आरोपी चढ्या दराने हे इंजेक्‍शन विकत असल्याचे समोर आले आहे.

हा प्रकार आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटलमध्ये 23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर या कालावधीत घडला आहे. शाहीद जब्बार शेख (वय 34), विजय बबन रांजणे (35), वैष्णवी राजेंद्र टाकोरकर (वय 30, तिघे रा. ओटास्कीम, निगडी) अशी आरोपींची नावे आहेत. मुस्ताफा अब्दुलगफार तांबोळी (वय 19, रा. चिखली) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी तांबोळी यांच्या आईंना करोनाची लागण झाल्याने त्यांना आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, करोनावर उपचारासाठी आवश्‍यक असलेले रेमडेसिवीर हे इंजेक्‍शनच फिर्यादी यांना मिळत नव्हते.

दरम्यान, स्टार हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या आरोपी शाहीद याने रेमडेसिवीर इंजेक्‍शनची मूळ किंमत 5 हजार 400 रुपये असताना फिर्यादी यांना 15 हजार 500 रुपये दोन इंजेक्‍शन विकले. आरोपीकडे औषध विक्रीचा परवाना नसतानाही हे अत्यावश्‍यक इंजेक्‍शन आरोपी चढ्या दराने विकत असल्याचे समोर आले. तर फिर्यादी यांच्या मित्राच्या वडिलांना देखील करोनाची लागण झाल्याने त्यांना स्टार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना देखील आरोपी शाहीद व त्याच्या अन्य दोन साथीदारांनी 6 हजार रुपयांना इंजेक्‍शन विकले.

याबाबत फिर्यादी यांनी मंगळवारी (दि.22) निगडी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यावर चौकशी करत पोलिसांनी तिघांवर जीवनावश्‍यक वस्तू कायदा, औषध किंमत नियंत्रण आदेश, औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत. याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.