Omicron – गुजरात आणि मध्यप्रदेशपाठोपाठ उत्तरप्रदेश या तिसऱ्या भाजपशासित राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तरप्रदेशात रात्री 11 ते पहाटे 5 या कालावधीत संचारबंदी लागू असेल. देशाच्या अनेक राज्यांत ओमायक्रॉन हा करोनाचा नवा अवतार फैलावत आहे. त्यामुळे देशात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातून केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क केले आहे.
तसेच, रात्रीची संचारबंदी लागू करण्याबाबत सुचवले आहे. त्या सूचनेनंतर उत्तरप्रदेश सरकारने रात्रीची संचारबंदी जाहीर केली. त्या राज्यात सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य केला जाणार आहे. उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्य सरकारने करोना फैलाव रोखण्यासाठी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.