चीनमधील घटणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण रोखण्यासाठी काही प्रांतात आता विशेष योजना लागू केल्या जाणार आहेत. चीनच्या ईशान्येकडीन जिलीन प्रांतात नवदाम्पत्यांनी लवकर नवीन अपत्यांना जन्म द्यावा यासाठी नवीन बाळाच्या नावे “बेबी लोन’ दिले जाणार आहे. नवीन जन्म घेणाऱ्या बाळाच्या नावे 2 लाख युआन (31,400 डॉलर)चे कर्ज दिले जाणार आहे.
प्रांताच्या धोरण पुस्तिकेमध्ये ही योजना जाहीर करण्यात आली आहे. या कर्ज योजनेतून सरकार कशाप्रकारे नवदाम्पत्याला मदत करणार आहे, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र कर्जाच्या व्याजदरावर सवलत दिली जाणार आहे. दाम्पत्याला किती अपत्ये आहेत, त्यावर ही व्याजाची सवलत अवलंबून असणार आहे.
चीनमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या तरुणांच्या प्रमाणात अधिक होते आहे. हे प्रमाण उलट होण्याच्या दृष्टीने ही योजना राबवली जाणार आहे. घटत्या जन्मदराला रोखण्यासाठी आणि जन्मदराला प्रोत्साहन दिले जाणार आहे. या कर्ज योजनेशिवाय जिलीन प्रांताबाहेरील व्यक्तींना निवासी परमिटदेखील दिले जाणार आहे. मात्र या दाम्पत्यांच्या मुलांची नोंदणी जिलीन प्रांतात होणे आवश्यक असणार आहे.