नवी दिल्ली (वंदना बर्वे) – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत हे विधानसभेच्या निवडणुकीत कॉग्रेसचा चेहरा राहणार आहे. कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज असे स्पष्ट संकेत दिले. कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज उत्तराखंडचे नेते हरीश रावत यांच्याशी निवासस्थानी विस्तृत चर्चा केली. ‘आपले हात बांधले आहेत’ अशाप्रकारचे ट्वीट रावत यांनी अलिकडेच केले होते. यानंतर ते कॉग्रेसवर नाराज असल्याची चर्चा रंगली होती.
अशात, राहुल गांधी यांनी रावत यांना घरी बोलावून चर्चा केली आणि त्यांची नाराजी दूर केली. विधानसभेच्या निवडणुकीत आपणच कॉग्रेसचा चेहरा राहणार असल्याचे रावत यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केले. ‘कदम कदम बढाये जा… कॉग्रेस के गीत गाये जा’ असे गीत गात त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
पत्रकारांशी बोलताना रावत म्हणाले की, कॉग्रेस अध्यक्षांना एक विशेषाधिकार प्राप्त आहे. निवडणुकीनंतर पक्षाची बैठक बोलाविली जाते आणि नेतेपदी कुणाची निवड करायची? हे ठरविण्याचे सर्वाधिकार अध्यक्षांना दिले जाते. यानंतर अध्यक्ष नेत्याची निवड करतात. प्रचार समितीचा प्रमुख या नात्याने आपण कार्य करणार आहोत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, हरीश रावत आणि त्यांच्या विरोधी गटातील कार्यकत्र्यांमध्ये हाणामारी झाली असल्याची घटना देहरादून येथे घडली. उत्तराखंड कॉग्रेसचे महासचिव राजेंद्र शाह यांनी रावत यांच्या विरोधात टीका केली आणि यामुळे हा वाद निर्माण झाला. यानंतर रावत दिल्लीला भेटीसाठी आले होते.
रावत यांनी अलिकडेच ‘ है न अजीब बात, चुनाव रूपी समुद्र को तैरना है, सहयोग के लिए संगठन का ढांचा अधिकांश स्थानों पर सहयोग का हाथ आगे बड़ाने के बजाय या तो मुंह फेर करके खड़ा हो जा रहा है या नकारात्मक भूमिका निभा रहा है. जिस समुद्र में तैरना है, सत्ता ने वहां कई मगरमच्छ छोड़ रखे हैं. जिनके आदेश पर तैरना है, उनके नुमाइंदे में हाथ-पैर बांध रहे हैं’ अशाप्रकारचे ट्वीट केले होते.
‘मनात विचारांच्या लाटा निर्माण झाल्या आहेत. हरीश रावत आता खूप झाले. खूप हातपाय मारले. आता विश्रांती घेण्याची वेळ आहे. अशातच मनाच्या एका कोपयातून ‘न दैन्यं न पलायनम’ असा आवाज येतो. यामुळे द्विधा मनस्थितीत आहे. नवीन वर्षात भगवान केदारनाथ आपल्याला मार्गदर्शन करतील’, असेही ट्वीटमध्ये लिहिले होते.