नवी दिल्ली – कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टीत जागावाटपाबाबत सहमती झाली आहे. मात्र गुजरातमधील भरूच मतदारसंघावरून (Gujarat Lok Sabha) पेच निर्माण झाला आहे. कॉंग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचा हा मतदारसंघ आमच्यासाठी भावनिक असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे. अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. तर अहमद पटेल यांचे पुत्र फैझल हे येथून लढण्याच्या पूर्ण तयारीत आहेत.
दरम्यान, फैझल यांच्या भगिनी मुमताजही भरूचमधून लढण्याची तयारी करत आहेत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या नावाचा विचार करत असल्याची बातमी काही माध्यमांनी दिली असली तरी मुमताज यांनी त्याचा इन्कार केला आहे. या सर्व घडामोडी पाहता गुजरातमधील हा मतदारसंघ अचानक लक्षवेधी ठरला आहे. मी या मतदारसंघात सातत्याने काम केले आहे आणि येथील उमेदवार मी आहे.
आपचा उमेदवार येथे जिंकू शकत नाही असे फैझल यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले. पक्षश्रेष्ठींशी माझे बोलणे झाले आहे. माझ्या बहीणीचीही हीच इच्छा आहे की मी येथून लढावे. त्यांनी १० जानेवारी रोजीच मला हे स्पष्ट केले होते की त्या पक्षसंघटनेचे काम करतील आणि मी लोकसभा लढवेल अशी माहितीही फैझल यांनी दिली.
दरम्यान, मुमताज या जागेवरून निर्माण झालेल्या पेचाबाबत बोलताना म्हणाल्या आम्ही कॉंग्रेसशिवाय अन्य कोणत्या पक्षाचा येथे प्रचार करणार नाही. या जागेबाबत कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तिव्र आहेत. जर ही जागा आम्हाला मिळाली नाही, तर केवळ माझेच नाही तर असंख्य कार्यकर्त्यांचे मन मोडेल.
त्यामुळे पक्षश्रेष्ठी विचार करून निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. संपूर्ण कॉंग्रेस एक कुटुंब असून श्रेष्ठींच्या निर्णयाचा आम्ही आदर करू. मी अहमद पटेल यांची मुलगी आहे. माझी विचारधारा कॉंग्रेसशी जोडली गेली आहे. त्यामुळे मी येथेच राहणार. नाराज होऊन दुसऱ्या पक्षात जाणार नाही.