हैदराबाद – गुजरातमध्ये सत्तारूढ भाजपच्या विरोधात लाट आहे. आप केवळ हवेत आहे. त्या पक्षाचे जमिनीवर अस्तित्व नाही, असा दावा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केला. गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणामधून मार्गक्रमण करत आहे. त्या यात्रेदरम्यान राहुल यांची एका ठिकाणी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांना गुजरात निवडणुकीविषयी प्रश्न विचारण्यात आले. आपने दिलेल्या जाहिरातींच्या आधारे प्रसारमाध्यमांनी त्या पक्षाची हवा निर्माण केली आहे. पण, गुजरातमध्ये आपला पाठिंबा असल्याचे आढळत नाही. त्याउलट, गुजरातमध्ये कॉंग्रेसचे मजबूत अस्तित्व आहे.
कॉंग्रेस पक्ष अतिशय ताकदीने त्या राज्यातील निवडणुकीला सामोरा जात आहे, अशी भूमिका राहुल यांनी मांडली. गुजरात आणि हिमाचल प्रदेशात प्रचाराला केव्हा जाणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आहेत.
माझा उपयोग कसा करून घ्यायचा याविषयीचा निर्णय तेच घेतील, असे उत्तर राहुल यांनी दिले. हिमाचलमधील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक याआधीच जाहीर झाले आहे. तर, गुजरात निवडणुकीची घोषणा येत्या काही दिवसांत अपेक्षित आहे.