अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहे. त्या निकालाची प्रतीक्षा न करता भाजप आणि कॉंग्रेसने विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू केले आहेत. गुजरातमध्ये 5 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यासाठीचे मतदान होणार आहे. मात्र, पहिल्या टप्प्यासाठी याआधी झालेल्या मतदानाचा आधार घेऊन भाजप आणि कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष आपापल्या विजयाचे भाकीत करत आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांनी विजयाचे मागील सर्व रेकॉर्ड मोडून पक्ष गुजरातची सत्ता राखेल, असा दावा केला. मागील वेळेपेक्षा यावेळी पहिल्या टप्प्यात मतदानाची कमी टक्केवारी नोंदली गेली. तसे असले तरी यावेळी मागील वेळेपेक्षा 10 लाख मते वाढली आहेत. मागील वेळी 1.41 कोटी, तर यावेळी 1.51 कोटी मतांची नोंद झाली, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
दुसरीकडे, कॉंग्रेसचे गुजरात प्रभारी रघू शर्मा यांनी पुढील सरकार आमचेच असेल, असा प्रतिदावा केला. पहिल्या टप्प्यातील मतदानाचा पॅटर्न पाहता कॉंग्रेस 89 पैकी 65 जागा जिंकेल. दोन्ही टप्प्यांत मिळून कॉंग्रेसच्या हाती 125 जागा येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत.