अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी गुरूवारी सुमारे 60 टक्के मतदान झाले. त्यामुळे 89 मतदारसंघांमध्ये नशीब आजमावत असलेल्या 788 उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) बंद झाले.
काही तुरळक प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. मतदानाचा अवधी संपल्यानंतरही काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. त्यामुळे अंतिम आकडेवारी हाती आल्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यामुळे गुजरातमधील जवळपास निम्म्या जागांवरील मतदानाची प्रक्रिया समाप्त झाली आहे. त्या राज्यात विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत.
उर्वरित 93 जागांसाठी 5 डिसेंबरला दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात मतदान होईल. अंतिम टप्प्यातील प्रचारासाठी आता केवळ दोन दिवसांची अवधी शिल्लक आहे. त्यामुळे सर्वच पक्ष प्रचाराचा धडाका उडवून देतील. गुजरातमध्ये यावेळी तिरंगी लढत होत आहे.
भाजपला सत्ता राखण्यासाठी कॉंग्रेस आणि आप या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान मोडून काढावे लागणार आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी (8 डिसेंबर) जाहीर केला जाणार आहे.