नवी दिल्ली – गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने विक्रमी विजयाची नोंद केली. 1960 मध्ये राज्याची स्थापना झाली असून या राज्यात सलग सातव्यांदा सरकार स्थापन करणारा हा पहिला पक्ष ठरला आहे. जे विक्रमी बहुमत पक्षाने मिळाले आहे त्याची गुजरात आणि देशात चर्चा झालीच, मात्र विदेशी प्रसारमाध्यमांनीही या घटनेला ठळक प्रसिध्दी दिली आहे. विशेष म्हणजे त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करण्यातत आली आहे.
सिंगापूरचे द स्ट्रेटस् टाइम्स, जपानचे निकेइ एशिया, अल जझीरा, इंडिपेंडट एबीपी न्यूज या सारख्या बड्या विदेशी माध्यमांनी य विजयाची दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टीसाठी मोठा सहारा आहेत व गुजरातचा विजय 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या लोकप्रियतेचा मोठा संकेत आहेत असे ब्रिटनच्या द गार्डियन या दैनिकाने म्हटले आहे.
भारतीय जनता पार्टी 1995 पासून गुजरातमध्ये एकही विधानसभा निवडणूक हरलेली नाही व त्यांच्या या विजयाचे श्रेय नरेंद्र मोदी यांना जाते असे निकेई एशियाने म्हटले आहे. मोदी या राज्यातील सगळ्यांत लोकप्रिय नेते असून पंतप्रधान होण्यापूर्वी ते 13 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते याकडेही या बातमीत लक्ष वेधण्यात आले आहे.
जपानच्या अन्य एका माध्यमाने म्हटले आहे की मोदींनी गुजरातमध्ये अनेक प्रचारसभा घेतल्या आणि आपली सगळी ताकद भाजपने पणाला लावली होती. आपल्या राज्यात जन्मलेले नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्तराव भारताचे प्रनिधित्व करतात ही बाब गुजराती लोकांना अभिमानाची वाटते असेही त्यांनी म्हटले आहे. ब्रिटनच्या इंडिपेंडंटच्या म्हणण्यानुसार गुजरातमधील हा विजय 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीकोनातून भारतीय जनता पार्टीसाठी फार उपयुक्त राहणार आहे.