अहमदाबाद – देशभरातील सगळ्याच प्रमुख वाहिन्यांनी काल घेतलेल्या एक्झिट पोल मध्ये भाजपला मोठ्या बहुमताने सत्ता मिळण्याचे संकेत दिल्याने गुजरात प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या गोटात उत्साह संचारला असून राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी या पक्षाने आता आत्मविश्वासाने तयारी सुरू केली आहे.
गुजरात भाजपचे मुख्य प्रवक्ते यमल व्यास यांनी दावा केला आहे की गुजरात मध्ये प्रवेश करणाऱ्या आम आदमी पक्षाला राज्यात एकही जागा मिळणार नाही. गुजरातची मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे. आक्रमक प्रचार मोहीम आणि भरमसाठ आश्वासने देऊनही एक्झिट पोलनुसार अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला दोन ते 13 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपला या राज्यात आजपर्यंत कधीही मिळाल्या नाहींत इतक्या जागा मिळतील असा अंदाज मतदानोत्तर जनमत चाचण्यांमध्ये वर्तवण्यात आल्याने सगळेच भाजप नेते उत्साहात आहेत.
व्यास म्हणाले, आम्हाला सुरुवातीपासून विश्वास होता की गुजरातची जनता आमच्या पाठीशी आहे आणि भाजपचा मोठा विजय होईल.”ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि भारतासाठी केलेल्या सर्व कामांमुळे गुजरातमधील लोकांचे प्रेम आमच्या पाठीशी आहे. एक्झिट पोलचे आकडे आमच्या पंतप्रधानांबद्दलचे प्रेम दर्शवतात. आमचा विजय सुनिश्चित करण्यासाठी जमिनीवर असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांनीही योगदान दिले आहे असे ते म्हणाले.
व्यास म्हणाले की, गुजरातमध्ये ‘आप’च्या प्रवेशाची भाजपला कधीही काळजी नव्हती आणि मोफत वीज यासारख्या आश्वासनांसाठी गुजरातमधील जनता केजरीवालांच्या आश्वासनाला भुलणार नाहीत असा आमचा विश्वास होता. गुजरात भाजपचे सरचिटणीस प्रदीपसिंह वाघेला यांनी दावा केला आहे की त्यांच्या पक्षाला एक्झिट पोलमधील अंदाजापेक्षा जास्त जागा मिळतील.ते म्हणाले, भाजप पूर्वीचे सर्व विक्रम मोडेल. गुजरातमध्ये इतर कोणत्याही पक्षाला मिळालेल्या जागांपेक्षा आम्हाला जास्त जागा आणि मताधिक्य मिळेल.