नवी दिल्ली ( Governor VK Saxena VS AAP ) – दिल्लीतील सत्तारूढ आपने थेट नायब राज्यपाल व्ही.के.सक्सेना यांनाच आरोपांच्या घेऱ्यात आणले आहे. त्यामुळे सक्सेनाही आक्रमक झाले असून आपच्या काही नेत्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. दिल्लीत मागील काही काळापासून आप विरूद्ध सक्सेना असा संघर्ष पाहावयास मिळत आहे.
तशातच आपने सक्सेना यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष असताना सक्सेना यांनी नोटाबंदीच्या काळात 1 हजार 400 कोटी रूपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला, असा खळबळजनक आरोप आपने केला.
त्यावरून कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय सक्सेना यांनी घेतल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. आपने केलेला आरोप खोटा आणि बदनामीकारक आहे. नोटाबंदीच्या काळात खादी आणि ग्रामोद्योग आयोगातील गैरव्यवहाराशी संबंधित एक प्रकरण समोर आले. पण, ते केवळ 17 लाख रूपयांशी संबंधित आहे.
त्या प्रकरणाचा तपास याआधीच करून सीबीआयने दोन कर्मचाऱ्यांविरोधात आरोपपत्रही दाखल केले. ते प्रकरण दिल्लीतील न्यायालयात प्रलंबित आहे, अशी माहितीही सक्सेना यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. ( Governor VK Saxena VS AAP )