कराची -पाकिस्तानमधील सिंध प्रांताचे गव्हर्नर इम्रान इस्माईल यांना करोनाची लागण झाली आहे. मागील दहा दिवसांत त्यांनी अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या. त्या बैठकांना उपस्थित राहिलेल्यांची चिंता आता वाढली आहे.
याआधी सिंध प्रांताचे शिक्षण मंत्री सईद घनी यांना करोनाची बाधा झाली होती. मात्र, आता ते करोनामुक्त झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ इस्माईल यांच्या रूपाने पाकिस्तानातील आणखी एक उच्चपदस्थ करोनाग्रस्त बनला आहे. इस्माईल हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय मानले जातात. करोना संसर्गामुळे इस्माईल यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील करोना संकट आणखी गडद होत आहे.
त्या देशातील बाधितांच्या संख्येने 14 हजारांचा टप्पा पार केला आहे. त्या देशात करोनाने आतापर्यंत 301 बाधितांचा बळी घेतला आहे. पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतांमध्ये करोनाचा फैलाव सर्वांधिक आहे. त्या प्रांतांमधील करोनाबाधितांची संख्या प्रत्येकी 5 हजारांच्या आसपास आहे. करोनाचा फैलाव उग्र रूप धारण करत असला तरी पाकिस्तानमध्ये त्याची तीव्रता इतर देशांप्रमाणे नसल्याचे म्हणत पंतप्रधान इम्रान खान टीकेपासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत.