अकोला: अकोल्यात करोनामुक्त झालेल्या एका रुग्णाला काल डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवत त्याचा उत्साह वाढवला. मात्र तो घरी पोहोचल्यानंतर त्याच्या गृहप्रवेशावेळी सर्वांनी त्याला कडकडून मिठी मारली. यामुळे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले.
अकोला शहरातील अकोटफैल परिसरात राहणार एक व्यक्ती 4 एप्रिलला करोना संशंयित म्हणून रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर त्याचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान 13 एप्रिल, 19 एप्रिल, 20 एप्रिल, 23 आणि 24 एप्रिल या सर्व दिवशी त्याची फेरतपासणी करण्यात आली.
या चाचण्यांचा अहवाल समाधानकारक असल्याने सोमवारी त्याला कोरोनामुक्त घोषित करण्यात आले. त्यानंतर हा रुग्ण घरी पोहोचल्यानंतर सोशल डिस्टसिंगचे सर्व नियम अक्षरश: पायदळी तुडवण्यात आले. हा रुग्ण रूग्णालयातून घरी आल्यानंतर अनेक उपस्थितांनी त्या रूग्णासोबत हस्तांदोलन केलं. त्याची गळाभेट घेतली. कोरोना रुग्ण बरा होऊन आल्यानंतर गळाभेट टाळण्याचं सांगितलं आहे. मात्र तरीही या रुग्णाच्या स्वागताला नातेवाईकांची गर्दी होती. या रुग्णाला पुढचे 14 दिवस क्वारंटाईन केलं जाणार आहे.