मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी विकसित भारत संकल्प यात्रा गावागावांत राबवली जात आहे. पण त्यावरील एका घोषवाक्याला गावकरी मोठ्या प्रमाणावर आक्षेप घेत असल्याने आता शासकीय कर्मचाऱ्यांनी या कामास नकार दिला आहे. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेकरिता समन्वय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिले आहे. बऱ्याच गावामध्ये हा संकल्प यात्रेचा रथ गेल्यानंतर वाद निर्माण होत आहेत. या यात्रेमध्ये करण्यात येणाऱ्या ‘मोदी सरकारची हमी’ या जाहिरातीला लोकांकडून तीव्र विरोध होत आहे.
अनेक ठिकाणी अकारण कर्मचारी – अधिकारी यांना शिवगाळ केली जाते, काही वेळेस दगडफेक सुद्धा होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच या संकल्प यात्रेमध्ये महिला कर्मचारी यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
गावात संकल्प यात्रा जाण्याआगोदरच आम्हाला भ्रमणध्वनीवरून विचारणा करतात की, तुम्ही मोदी यांचा प्रचार का करत आहात? भारत सरकारचा करावा, संकल्प यात्रा रथावर ‘मोदी सरकार’ असा उल्लेख असल्याने आम्ही त्यांना उत्तर देऊ शकत नाहीत, असे सांगत या कर्मचाऱ्यांनी कामास नकार दिला आहे.