जळगाव – लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस जास्ती जास्त जागा जिंकाव्यात असा आमचा प्रयत्न आहे. आगामी वर्ष हे निवडणुकीचे असून आमचा संकल्प हा यश मिळवण्याचा आहे. महाविकास आघाडीत जागावाटपावरून कोणताही तिढा नाही. जागा वाटपाची चर्चा ही अंतिम टप्प्यात आहे. पुढील 15 दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागांसंदर्भात निर्णय घेईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले.
नुकतेच लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेमध्ये महायुतीला कमी जागा आणि महाविकास आघाडीला जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे. सर्वेनुसार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 35 ते 40 हून अधिक जागा निवडणूक येतील, असा दावा शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.
एकनाथ खडसे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळवण्यासाठी आमचा आग्रह आहे. या मतदारसंघातून मी स्वत: निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. या मतदारसंघातून लढण्यासाठी पक्षाने मला सांगितले आहे. पण माझी तब्येतीचे कारण आहे. मी डॉक्टरांच्या सल्लानुसार पुढे निर्णय घेईन. रावेर मतरासंघातून लढण्यास इच्छुक आहे आणि ही जागा आम्ही जिंकू, असा माझा विश्वास आहे.