गुड न्यूज मंगळवारनंतरच!; अजित पवारांचे स्पष्टीकरण

अजित पवार : शरद पवार, सोनिया गांधी यांची उद्या दिल्लीत भेट

वाघळवाडी: राज्यातील सत्ता स्थापनेच्या दृष्टीने सोनिया गांधी आणि शरद पवार यांची दिल्लीत मंगळवारी (दि. 19) भेट होणार आहे, त्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल आणि सत्ता स्थापनेसाठी जोपर्यंत 145ची मॅजिक फिगर गाठली जात नाही तोपर्यंत गोड बातमी येणार नाही, त्यामुळे तोपर्यंत आपल्याला राष्ट्रपती राजवटीतच रहावे लागणार असल्याचे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

सोमेश्‍वरनगर येथील सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी (दि. 17) पवार यांच्या हस्ते झाला, त्यानंतर सत्ता स्थापनेची गोड बातमी केव्हा येणार असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता त्यांनी आपली भूमिका मांडली. अजित पवार म्हणाले की, आमदार फुटण्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. या निवडणुकीत अनेकजण पहिल्यांदाच निवडून आलेले असल्याने, फुटाफूट होणार नाही. पक्ष सोडल्यावर काय निकाल लागतो हे साताऱ्यातील निकालावरून सगळ्यांना पाहिले आहे. त्यामुळे आता कुणी असे करणार नाही.

  • खासदार संसदेत आवाज उठवणार
    राज्यपालांनी जाहीर केलेली पिकासाठी हेक्‍टरी 8 हजार तर फळबागांसाठी हेक्‍टरी 18 हजार ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे, त्यामुळे प्रत्यक्ष नुकसानपाहून मदत दिली पाहिजे. सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट असून त्यामुळे सगळे निर्णय केंद्रातून होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आमचे खासदार केंद्रात आवाज उठवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here