बळजबरीने तिकीट दिले, ते आमदार झाले- अजित पवार

 सोमेश्‍वर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

वाघळवाडी: या विधानसभा निवडणुकीत काहींना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने बळजबरीने तिकीट दिले ते सगळे आमदार झाले. दौंड विधानसभेचे उमेदवार माजी आमदार रमेश थोरात पण आमदार झाले असते. परंतु आपल्याच पुढाऱ्यांच्या गावात कमी मतदान झाले, अन्‌ अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभाव झाला, असे अजित पवार यांनी सांगितले.

वाघळवाडी-सोमेश्‍वरनगर येथील सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे गव्हाण पूजन आणि गळीत हंगाम शुभारंभ पवार यांच्या हस्ते रविवारी (दि. 17) पार पडला, त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, वाईचे मकरंद पाटील, पुरंदरचे संजय जगताप, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, प्रशांत काटे, सतीश काकडे, संजय भोसले, शहाजी काकडे, प्रमोद काकडे, बबनराव टकले, नीता फरांदे, बी. जी. काकडे, रामचंद्र भगत, सतीश खोमणे, लक्ष्मण चव्हाण, तुकाराम जगताप, अमृता गारडी, विजय सोरटे, राहुल भापकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला.

अजित पवार म्हणाले की, राज्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी मोडून पडला आहे. राष्ट्रपती राजवट असताना राज्यपालांना ही काही अडचणी असतात; मात्र राज्यपालांनी केलेली मदत ही अत्यंत तोकडी आहे. ही मदत वाढवून मिळली यासाठी राज्यपालांना भेटणार आहे. वेळेत सत्ता स्थापन न झाल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली, मतदारांना पुन्हा मतदानाची वेळ येणार नाही, कुणाचे देखील सरकार आले तर ते स्थिर यावे जेणेकरून शेतकऱ्याला न्याय मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

  • बारामतीकरांचे कोणत्या शब्दात उपकार मानू
    दौंड तालुका सोडला तर पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील राष्ट्रवादीच्या जागा निवडून आल्या आहेत. बारामतीकरांनी तर रेकॉर्ड ब्रेक करीत राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून दिले. बारामतीकरांचे उपकार कोणत्या शब्दात मानू हेच समजत नाही. बारामतीकरांनी भरभरून प्रेम दिले, असे अजित पवार यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.