नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दराने उच्चांक गाठला होता.त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करणे कठीण झाले होते. मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत घट झाल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
मागच्या आठवड्यात 10 ग्रॅम सोन्याचे दर 63,300 रुपयांवरुन 61,300 वर आले म्हणजेच सोन्यांच्या दरात 2 हजारांनी घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जागतिक पातळीवर बँकेच्या व्याज दरात वाढ झाली त्यामुळे गुंतवणूक दारांनी सोन्याऐवजी बँकेत गुंतवणूक करण्याचे ठरवले त्यामुळे सोन्याच्या मागणीत घट झालेली पाहायला मिळत आहे.
गुडरिटर्न्सच्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, एक किलो चांदीसाठी 73,500 रुपये मोजावे लागणार आहे तर 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ग्राहकांना 55, 100 मोजावे लागतील. तसेच आठवड्याभरापूर्वी 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 63,300 रुपये मोजावे लागत होते. तर आज यांसाठी 61,300 रुपये मोजावे लागतील.
दरम्यान, 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी (Silver), जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.