मुंबई – अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी सध्या ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटात तो आणि अभिनेत्री अवनीत कौर मुख्य भूमिकेत आहे. मात्र या चित्रपटातील किसिंग सीनमुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. यात नवाजुद्दीने अवघ्या 21 वर्षाच्या मुलीसोबत लिपलॉक सीन केला आहे. यावरून नेटकऱ्यांनी त्याच्यावर संताप व्यक्त केला आहे. मात्र आता या संपूर्ण प्रकरणावर नवाजुद्दीन सिद्दिकीने प्रतिक्रिया दिली आहे.
वयाने मोठ्या अभिनेत्याने लहान अभिनेत्रीबरोबर रोमान्स करण्यात अडचण काय आहे? असा सवाल नवाजुद्दीनने एका मुलाखतीदरम्यान विचारला. “रोमान्स करण्यासाठी वयाचं बंधन नसतं. तरुणांमध्ये रोमान्स शिल्लक राहिलेला नाही, ही समस्या आहे. आम्ही त्या पिढीचे आहोत, जिथे आम्ही वर्षानुवर्षे प्रेमात होतो. आजही शाहरुख खान रोमँटिक भूमिका करतो, कारण तरुण पिढी कोणत्याच कामाची नाही. त्यांना रोमान्स माहित नाही,” असं नवाजुद्दीन म्हणाला.
यावेळी नवाजुद्दीनने तरुण पिढीच्या सोशल मीडिया वापराबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “आताच्या पिढीचं प्रेम फक्त सोशल मीडियावर आहे. आता सर्व काही व्हॉट्सअॅपवर घडतं, मग ते प्रेम असो वा ब्रेकअप. खरं तर ज्या लोकांनी रोमान्स केला आहे, जे रोमान्स जगले आहेत, तेच रोमान्स करू शकतात. दुसरं कोण करेल?” दरम्यान, ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाची निर्मिती कंगना राणौतच्या मणिकर्णिका फिल्म्सने केली आहे. हा चित्रपट 23 जूनला अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.