मुंबई – अभिनेते मनोज वाजपेयी यांनी कमी कालावधीतच बॉलीवूडमध्ये मोठे यश संपादन केले आहे. ओटीटीवर देखील त्यांनी दमदार कामगिरी केली आहे. ‘द फॅमिली मॅन’ सिरिजमधून त्यांनी ओटीटीवर पदार्पण केले होते. या सिरिजला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र फॅमिली मॅनसाठी कमी मानधन मिळाल्याचा खुलासा एका मुलाखतीत मनोज वाजपेयी यांनी केला आहे.
एका मुलाखतीत मनोज वाजपेयी म्हणाले की, “कोणत्याही चित्रपटासाठी मी सलमान-शाहरुख खान सारख्या बड्या स्टार्सप्रमाणे मानधन घेत नाही. ओटीटीचे निर्माते देखील इतर निर्मात्यांपेक्षा कमी नाही. हे सुद्धा फक्त मोठ्या स्टार्सला पैसे देतात, मला जास्त पैसे मिळत नाहीत जितके फॅमिली मॅनसाठी मिळायला हवे होते. पण कोणी गोरा (हॉलिवूड कलाकार) आला आणि त्याने शो केला तर त्याला पैसे दिले जातात. मोठमोठ्या ब्रँड्सची चीनमध्ये फॅक्ट्री आहे कारण तिकडे मजुरी स्वस्त आहे. आम्ही यांच्यासाठी असेच स्वस्त मजूर आहोत.”
फॅमिली मॅनमध्ये काम करणे पत्नी शबानाला मान्य नव्हते, असेही मनोज यांनी यावेळी सांगितले. सुरवातीला तिला फिल्म सोडून सीरिअल करत बसणार असे वाटले होते. इतकी काय गरज आहे पैशांची? करिअर नको बर्बाद करु. मात्र तेव्हा ओटीटी काय आहे याची तिला कल्पना नव्हती. तेव्हा मी तिला ओटीटीचं महत्व समजावून सांगितले होते,” असे मनोज वाजपेयी यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या मनोज वाजपेयी यांच्या ‘सिर्फ एक बंदा काफी है’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या मनोज यांच्या ‘द फॅमिलीमॅन सीझन-3’ या वेब सीरिजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. या सीरिजच्या पहिल्या दोन भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता.