भुलेश्वर – पुरंदर तालुक्यात सध्या अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असली तरी शेतीमध्ये पाण्याचे योग्य नियोजन करुन माळशिरस येथील प्रगतीशील बागायतदार सोमनाथ सोपान जगदाळे यांनी गणेशोत्सवाचे नियोजनानुसार विविध फुलांची लागण केली होती. यातील पेपर व्हाईट फुलाला आज उच्चांकी बाजारभाव मिळत असून एक किलोला 300 रुपये बाजारभाव असल्याने शेतकरी जगदाळे यांच्या फुलशेतीला गणपतीच पावला असल्याचे म्हंटले जात आहे. जगदाळे यांची फुल शेती शेकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
याबाबत शेतकरी जगदाळे यांनी सांगितले की, पेपर व्हाईट फुलाचे उत्पादन घेण्यासाठी जमीनीची नांगरणी करुन जमीन तापू दिली, त्यानंतर शेताला खत घालून मशागत केली. बेड तयार करून ठिबक सिंचन तयार केले. मद्रास येथील कृष्ण गिरी रायकोट्टा येथून दीड रुपये प्रति नग या प्रमाणे पेपर रोपे आणून साडे तीन फूट बाय सव्वाफुटावर एप्रिल महिन्यात लागण केली. फुलांना एकरी 50 हजार खर्च आला. शेतात पेपर व्हाईट, भाग्यश्री, पिवळे, पांढरे, सेंट व्हाईट, पौर्णिमा, कोईमतूर सामंती फुलांच्या अशा विविध जाती आहेत. दुष्काळी परिस्थिती वारंवार निर्माण होत असल्याने शेततळे खोदले आहे.
पावसाळ्यात वाया जाणारे पाणी शेततळ्यात साठवले होते. उन्हाळ्यात याच पाण्याचा लागणीसाठी वापर केला. खते व फवारणी याचे योग्य नियोजन करुन फुल पिके चांगल्याप्रकारे आली. श्रावण महिन्यात पेपर व्हाईट फुले बाजारपेठेत पाठवण्यात सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच या फुलाला चांगला बाजारभाव मिळाला. दोन दिवसापुर्वी तर 300 रुपये प्रति किलो भाव मिळाला. या फुलांना चांगला बाजारभाव आहे. याची विक्री पुणे, मुंबई, हैदराबाद, बेळगाव, बडोदा, सोलापूर या ठिकाणी विक्री केली जाते.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने पेपर व्हाईट हे अतिशय स्वस्त व सोपे फुल पीक आहे. बाहेर देशातील फुलांच्या जाती पेक्षा जास्त उत्पन्न व चांगला बाजारभाव मळतो. बाजारपेठेत जादा मागणी आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारे हे पिक आहे.
– सोमनाथ जगदाळे, प्रगतशील शेतकरी, माळशिरस (पुरंदर)