पाटणा – महसूल गुप्तचर संचलनालयाने बिहारमधील पतालपुरा रेल्वे स्थानकामध्ये तब्बल 1.01 कोटी रुपयांचे सोने जप्त केले आणि दोघाजणांना अटक केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे “डीआरआय’च्या पथकाने गुरुवारी रात्री 9.15 वाजता पाटलीपुत्र रेल्वे स्थानकामध्ये दोघाजणांना ताब्यात घेतले.
हे दोघेही दिब्रुगड- नवी दिल्ली विशेष कोविड रेल्वेने प्रवास करत होते. त्यांच्या जवळ 1991.91 ग्रॅम वजनाची सोन्याची 12 बिस्किटे होती. या सोन्याबद्दल या दोघांनाही समाधानकारक माहिती आणि कागदपत्रे देता आली नाही, असे सूत्रांनी सांगितले.
सरकारी तज्ज्ञांकडून या सोन्याची तपासणी केली असता त्याचे मूल्य 1.01 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. पकडलेले सोने म्यानमारमधून तस्करी करून आणले गेले असल्याचे अटक केलेल्या दोघांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.