पुणे – गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केलेल्या डी.एस.कुलकर्णी ऊर्फ डीएसके प्रकरणात “ड्रीम सिटी’ हा प्रकल्प विकसित करण्यास अबूधाबी येथील एका बांधकाम व्यावसायिक कंपनीने तयारी दर्शविली आहे.
त्या कंपनीला परवानगी देण्यात यावी, अशा आशयाच्या मागणीचा अर्ज विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी फेटाळला. सुनावणीच्या या टप्प्यावर संबंधित अर्जाचा विचार करता येणार नाही, असे नमूद करत न्यायालयाने याबाबतच आदेश दिला.
य ऍड. चंद्रकांत बिडकर यांनी न्यायालयात हा अर्ज दाखल केला होता. अबूधाबी येथील “एएफसीओ इन्व्हेस्टमेंट अँड मॅनेजमेंट’ या कंपनीने डीएसकेंचा ड्रीम सिटी प्रोजेक्ट विकसित करण्याचा प्रस्ताव दिला असून त्यासाठी आगाऊ रक्कम देण्यास ते तयार आहेत.
न्यायालयाने त्यांना परवानगी दिल्यास विकसनाचे नियम करुन काम सुरु करता येईल, त्यासाठी परवानगी देण्यात यावी, तसेच त्यातून येणारे पैसे गुंतवणूकदारांना देता येतील, असे अर्जात नमूद करण्यात आले होते. या प्रकरणात आतापर्यंत 32 हजारहून अधिक गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे.
न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. विशेष सरकारी वकिलांनी या अर्जाला विरोध केला. संबंधित दावा तडजोडीचा नाही. अशा प्रकारे अर्ज दाखल करुन केवळ न्यायालयाचा वेळ वाया घालविण्यात येतो आहे. त्यामुळे हा अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तीवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला.