पुणे : जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसने आता महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. पुण्यात आज दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, कोरोनाविरोधात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चक्क घोषणा दिल्या आहेत.
रामदास आठवले हे आपल्या कवितांसाठी कायमच चर्चेत असतात. मुंबईमध्ये करोनासंदर्भातील जनजागृतीसाठी काही परदेशी नागरिक बॅनर घेऊन उभे होते. त्यावेळी आठवले यांनी त्यांची भेट घेतली. हे परदेशी नागरिक मूळचे चीनचे असून चीनचे भारतातील काऊन्सील जनरल तांग गुइलाई हेही उपस्थित होते. यावेळी आठवले यांनी भारत-चीन संबंध सुदृढ राहोत असे म्हणत ‘गो करोना… गो… गो करोना… गो’ अशा घोषणा दिल्या. हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.