लस रु. 250 ! केंद्राकडून करोना लसीचे दर निश्‍चित

मुंबई – करोना लसीच्या प्रत्येक डोसमागे खासगी रुग्णालये 250 रुपये आकारू शकतात. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि केंद्रीय आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्‍य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत आणि प्रशिक्षणात ही माहिती देण्यात आली, असे राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

करोनाची लस देणाऱ्या प्रत्येक व्यक्‍ती आणि प्रत्येक डोस मागे खासगी रुग्णालयांना 100 रुपये सेवा शुल्क आकारता येईल. या शिवाय प्रत्येक व्यक्‍तीच्या प्रत्येक डोस मागे डोसची किंमत म्हणून 150 रुपये आकारू शकेल. त्यामुळे खासगी रुग्णालयात प्रती व्यक्‍ती प्रती डोस अडीचशे रुपये आकारण्यात येतील, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.

ही सोय पुढील आदेश येईपर्यंत कायम असेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव वंदना गुरनानी यांनी सांगितले. हे शुल्क सांगून लसीकरण मोहिमेत खासगी रुग्णालयाचा सहभाग वाढवण्याची सूचना राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्‍चिम बंगाल, तेलंगणा आणि जम्मू-काश्‍मीर या राज्यांच्या मुख्य सचिवांबरोबर कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली.

कोविड प्रतिबंधक योग्य वर्तनाची अंमलबजावणी करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना भरमसाठ दंड आणि चलान आकारणे , जिल्हाधिकाऱ्यांबरोबर देखरेख व प्रतिबंधित सेवांचा बारकाईने आढावा तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने केलेल्या इतर उपाययोजनांची माहिती मुख्य सचिवांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.