नानूचे पाऊल पडे मागे

नानू तसा अगदी अस्सल मराठी माणूस! सभा-समारंभात भाग घेणारा, छत्रपती शिवरायांचा गजर होताच स्फूरण पावणारा, मिरवणुकीचं आकर्षण असणारा, गुढीपाडव्याला श्रीखंड आणि होळीला पुरणपोळीची अपेक्षा धरणारा, सकाळी उठल्यावर देवपूजा आणि रात्री लावणी ऐकण्याची इच्छा असूनही कीर्तनाला हजेरी लावणारा, एकीकडे बायकोचं सांगणं बहुतांशी वेळेस ऐकणारा आणि त्याचवेळी आपण किती रागीट होतो-आहोत, आपल्याला कसलीही भंपकगिरी चालतच नाही वगैरे सर्वांसमोर छातीठोकपणे सांगणारा तरीही आतून-बाहेरून खराखुरा प्रामाणिक असणारा नानू अस्सल मराठी माणूस! या मराठी माणसालाही एकदिवस आपल्या मराठीपणाच्या प्रेमाचा आणि मराठी असण्याचा राग आला नी सहसा कधीही न रागावणारा नानू रागावला. दिवसच तसा उगवला होता.

नेहमीप्रमाणे नानू सकाळी वेळेत उठला. विजेचा पत्ता आजही गूल होता. अर्थात, नानूला त्याची सवय होती. चरफडत आणि चाचपडत इन्व्हर्टरचं बटन दाबून नानूने तात्पुरत्या प्रकाशाची सोय केली. एका हाताने डोळे चोळत दुसऱ्या हाताने ट्रांझिस्टरची कळ फिरवली, तेव्हा हिंदी बातम्या भर वेगात सुरू होत्या. नानूच्या कानी पडलेली पहिलीच बातमी “गुजरातेत 24 तास वीजपुरवठा सुरू’ असण्याची होती. नानू मनातून नाराज झाला. सात तास भारनियमनाचा सामना नानू गेली कित्येक महिने करीत होता. त्याचे परिणाम आणि दुष्परिणामही त्याला अनुभवावे लागत होते. पुढच्या बातम्या ऐकण्याची नानूची चवच गेली. भारनियमन जणू रेडिओचाच दोष आहे अशा आविर्भावात नानूने रेडिओ बंद केला. तोपर्यंत दाराशी दूधवाला “भय्या’ आल्याची चाहूल नानूला लागली.

एकवेळ कोंबडा आपल्या आरवण्याची वेळ चुकवेल पण दूधवाला भैय्या साडेसहाला दूध घालणारच! नानूला त्याचा आधीचा मराठी दूधवाला आठवला. कुठल्याही वेळेस आणि कितीही उशिरा हा भाऊ आला तरी याची टांग वरतीच! एकदा नानूने ऑफिसला उशीर होतो अशी तक्रार करण्याचा सौम्य प्रयत्न केला तर त्यानेच नानूला प्रतिप्रश्‍न केला, “तुमचे ऑफिस एवढे लवकर कसे?’ खरं तर नानूचं मराठी रक्‍त त्याचवेळी खवळायला पाहिजे होतं पण दूधवालाही आपलाच माणूस, काय करणार, शेवटी एखादे दिवशी रक्‍त खवळायच्या आधी दूधवाला बदलणेच योग्य हा प्रामाणिक विचार नानूने केला आणि हा भय्या लावला.

घाईघाईने सारं आवरून नानू ऑफिसला पोहचला. दारातच तुपलोंढे शिपायाची सलामी झाली, “”क्‍या नानूशेठ आज बहोत जल्दी?”
नानूला या तुपलोंढ्याची आल्याबरोबर अंगावर येणारी हिंदी अजिबात आवडायची नाही. एवढी चांगली सुंदर मराठी मातृभाषा असताना तुपलोंढे नेहमीच हिंदीतच बडबडायचा. त्यामुळे रोजचा ठराविक संवाद ठरलेलाच.
“”तुपलोंढे स्वच्छ बोलाना”
“”क्‍यों?”
“”अरे मराठीचा अभिमान बाळगा आणि सारे मराठी आहोत.”
“”तो क्‍या हुआ”
“”होने का क्‍या, लेकीन…”

नानूच मराठी विसरला आणि लक्षात आल्यावर संतापत डोक्‍याला हात लावीत टेबलाकडे वळला. ऑफिस फिदीफिदी हसलं. त्या हसण्याकडे दुर्लक्ष करीत नानूने पिशवीतून हलकेच पेपर काढला. ही त्याची रोजची सवय. आल्या आल्या सुरुवातीला पेपर वाचल्याशिवाय त्याला कामाला हात घालावासाच वाटत नसे. पेपर वाचण्याचा आनंद नानूच्या दृष्टीने परमोच्च समाधानाचा असे. नानूने पेपरमध्ये डोके घातले आणि दहा मिनिटांत पेपरमध्ये घातलेले डोके आपण उखळात घातले की काय असे त्याचे त्यालाच वाटू लागले. पेपरमध्ये मराठी माणसांच्या आपसातील लाथाळ्या, विकासाचा घसरलेला दर, राजकारणातील अविवेकी सत्तालोलुपता, सख्ख्या भावांमधील भाऊबंदकीतून खून, शाळकरी मुलीवर बलात्कार, पाण्यासाठी वणवणणाऱ्यांची रांग, रॉकेलची रांग, रेशनमधील लाल गव्हाचा भ्रष्टाचार, पूरग्रस्तांना आलेल्या निधीची परस्पर लागलेली विल्हेवाट, पहिलवानाची हत्या, भेसळीच्या दुधातून विषबाधा अशा अनेक गरगरायला लावणाऱ्या घटनांचा झोत नानूवर येऊन आदळला. बरं प्रत्येक बातमीत मराठी बाणा दाखविणारा मराठी माणूस! नानूला कळेना, हा माझा मराठी माणूस आणि आपला मुलुख पुढे जाणार तरी कसा? नानू खंतावला, हबकला, नाराजला, सरतेशेवटी पेपरचा बोळा पिशवीत कोंबता झाला.

मनाची नाराजी कुठल्यातरी कोपऱ्यात दाबून टाकत नानू निमूटपणे काम करीत राहिला. आज त्याने अर्ध्या दिवसाची रजा घेतली होती. अलीकडेच घेतलेल्या गाडीचा नंबर मिळविण्यासाठी आर.टी.ओ. दरबारी दाखल झाला. त्याला पाहताच अनेक एजंट त्याच्याभोवती घिरट्या घालू लागले. “”क्‍या करनेका है, रिझनेबल रेटमे कर देंगे, डाक्‍युमेट बताओ”, अशा अनेक उद्‌बोधक घोषणा नानूच्या कानापर्यंत पोहोचत होत्या पण मनापर्यंत पोहोचत नव्हत्या. नानूला मराठी बोलणारा एजंट हवा होता. तेवढ्यात एकाने नानूशी मराठीत संवाद साधला. नानू हरखला. शेवटी मराठी रक्‍ताचा प्रश्‍न होता. नानूने घाईघाईने त्याच्याकडे कागदपत्रे सोपविली. त्याने कामासाठी लागणारी फी नानूला सांगितली. मराठी माणूस आहे, म्हणून जास्त वाटत असणारी ती फी नानूने ताबडतोब दिली. तासाभरात नानूचे काम झालेही. कागदपत्रे हातात घेताना नानूने त्याचे आभार मानले आणि मराठी भावंडं कसे एकमेकांना कामी येतात, त्याचा वास्ता दिला. ते ऐकल्यावर एजंट हसून म्हणाला,

“”अहो साहेब, मी मराठी नाही.”
“”काय,?” नानूला मोठाच धक्‍का बसला होता.
“”अहो, गेली अनेक वर्षे येथे राहतोय, त्यामुळे मराठी उत्तम बोलू शकतो एवढंच.”
“”मग येथे तुमच्यासारखं काम करणारे मराठी माणसे कोणी नाहीत का?”
“”आहे ना, हे काय”
असं म्हणून त्याने इतर एजंटकडे हात केला. नानूला अजून मोठा धक्‍का बसला. कारण नानू तेथे आल्या आल्या हिंदीत ज्यांनी त्याच्याशी संवाद साधला होता तेच ते मराठी बांधव होते. नानूने सकाळपासूनचा सातव्यांदा कपाळाला हात लावला. त्याला त्याच्या मराठीपणाचा, मराठी बांधवांचा, मराठी मुलुखाशी बेईमानी करणाऱ्यांचा प्रचंड संताप आला. नानूचा आजचा दिवसच “नान’मराठी उगवला होता आणि मराठीची आन घेतलेला नानू त्यावर काही करू शकत नव्हता.

डॉ. विनोद गोरवाडकर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.