अभिनेत्री भारती गोसावी:घेई जुळवून रंगभूमीशी !

भारती गोसावी, बाळ गोसावी या अभिनेत्याची पत्नी. पण स्वतः एक उत्तम अभिनेत्री. हास्याची कारंजी उडवणारे चित्रपट-नाट्य अभिनेते राजा गोसावी यांची भारती ही वहिनी. थोडक्‍यात काय, तर भारती, बाळ आणि राजा गोसावी हे सारेच गोसावी गुणी कलाकार. (नाव राजा आडनाव गोसावी केवढा हा विरोधाभास.) अर्थात, जेवढं खुद्द राजा गोसावी या अभिनेत्याचं नाव झालं तेवढं बाळ गोसावींचं झालं नाही आणि भारती गोसावींचं तर नाहीच नाही. खूप नाटकं करूनसुद्धा. परंतु याची जाणीव भारतीताईंना आहे, याची मला परवा त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणं झालं त्याक्षणी आली. “साठवण’ या सदरात या पूर्वी कुणा कुणावर लेख आले आहेत असं त्यांनी दूरध्वनीवरून विचारलं त्यावेळी मी सई परांजपे… अशा बऱ्याच जणींची नावं सांगितली. त्यावर त्या पटकन म्हणाल्या, “अहो सर, पण आम्ही या यादीत बसतो का?’ नाहीतर 1-2 भूमिका केल्या की आपण जणू आकाशात उडतोय अशा थाटात वावरणारी कलावंत मंडळीही अलीकडे बघायला मिळतात. आपली नेमकी गुणवत्ता काय याचं भान ज्या स्त्री-पुरुष कलावंतांना असतं ना त्यांना कधी नैराश्‍य नाही येत. परंतु स्वतःबद्दल नको एवढा फाजील आत्मविश्‍वास असणारी कलावंत मंडळी शेवटी त्यांच्या करीअरमध्ये अडचणीत सापडताना दिसतात हे दुर्दैव म्हणावं लागेल.

एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, चित्रपट क्षेत्रात अमिताभ बच्चन सारखा कलावंत हा बादशहाच असतो, तर मराठी चित्रपट सृष्टीत अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारखे कलावंत हे त्या दृष्टीने राजेच असतात किंवा डॉ. श्रीराम लागू यांच्यासारखा कलावंत हा मराठी रंगभूमीवरचा नटसम्राट असतो पण म्हणून त्यांच्याबरोबर दुय्यम भूमिका करणारे लहान-मोठे कलाकार हे काही नगण्य नसतात. तेच खरंतर आपल्या खांद्यावर रंगभूमी काय की चित्रपटसृष्टी काय यांची पालखी घेऊन पुढं जातात. केवळ स्टार काही करू शकत नाहीत. ते एकटे रंगभूमी किंवा चित्रपट पुढं नेऊ शकणार नाहीत. कल्पना करा विजू खोटे सारखा दुय्यम कलावंत “शोले’ सारख्या चित्रपटात नसता तर… त्याची त्या चित्रपटातली अनुपस्थिती आपल्याला जाणवली नसती का? शंकर घाणेकर यांच्या सारखा दुय्यम भूमिका करणारा कलाकारही किती उठावदार भूमिका करायचा हे आपल्याला ठाऊक नाही का? मान्यवर साहित्यिक पु. ल. देशपांडे त्यांच्या लंडन वास्तव्यामधला एक गमतीशीर अनुभव सांगायचे. एका इंग्लिश नाटकात एक राणी आणि त्या राणीचा हुजऱ्या असा एक प्रवेश असे. तो त्या नाटकाचा शेवटचाच प्रवेश असायचा. राणीचं वाक्‍य असायचं, “सो धिस इज द एंड’ आणि त्यावर तो हुजऱ्या म्हणायचा, “ऐस धिस इज’. मग सॉंग वगैरे वाजवायचा आणि ते शोकांतिकेचं नाटक संपायचं. पण एका प्रयोगात राणी ठरल्याप्रमाणं “सो धिस इज द एंड’ असं वाक्‍य म्हणाली. त्यावर तो हुजऱ्या म्हणाला, “सो इज धिस’. मला सांगा काय झालं असेल त्या नाटकाचं त्या दिवशी.

त्यामुळे दुय्यम भूमिका करणारे हे कलाकार मुख्य कलाकाराप्रमाणेच खूप महत्त्वाचे असतात आणि म्हणूनच नाटक वा चित्रपटसृष्टी टिकून राहण्यासाठी “नटवर्य’ जेवढे महत्त्वाचे तेवढेच दुय्यम भूमिका करणारेही महत्त्वाचे असतात. भारती गोसावी यांनी, तर दुय्यम भूमिका केल्याच पण त्याचबरोबर अनेकदा मुख्य भूमिकाही केलेल्या आहेत आणि त्यामुळे भारती गोसावी यांच्यासारख्या दुय्यम कलाकारांचे रंगभूमीवरचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे हे मान्यच करावं लागतं. विवाहापूर्वी दमयंती कुमठेकर या नावानं रंगभूमी-चित्रपटांत वावरणाऱ्या पुढं भारती गोसावी झाल्या. त्या दमयंती कुमठेकर असताना त्यांच्याबरोबर राघवेंद्र कडकोळ, प्रकाश घांगरेकर हे कलाकार असत आणि मीही त्यांच्याबरोबर फार पूर्वी काम केल्याचं मला स्मरतं. एक साधीसुधी अभिनेत्री आपली कुवत ओळखून या क्षेत्रात वावरणारी-वावरलेली. पन्नास वर्षे त्या रंगमंच-चित्रपटांत वावरत आहेत. याचा अर्थ “दुय्यम भूमिका करणारी अभिनेत्री’ असा शिक्‍कामोर्तब करण्यात या अभिनेत्रीनं आपल्या भूमिकांची किंवा कामाची फुशारकी न मारत बसता जवळपास दररोज कुठलं ना कुठलं तरी नाटक केलेलं आहे, मग त्या नाटकाचा प्रयोग भले पुण्यात-मुंबईत-नागपूर-औरंगाबाद-रत्नागिरी वा अन्य एखाद्या शहरात असो. हर प्रकारची गैरसोय सोसून केवळ भारती गोसावी यांनीच नव्हे, पण त्यांच्या समकालीन असणाऱ्या अरुणा आणि रजनी भट वा या सदरात ज्यांच्यावर लेख आहेत त्या सर्वच स्त्री-कलावंतांनी रंगभूमीची सेवा केलेली आहे.

त्या सांगतात की, 1958 साली “भानुविलास’ या पुण्यामधल्या थिएटरमध्ये त्यांनी “संगीत सौभद्र’ या नाटकात काम करून रंगभूमीवर प्रथम पदार्पण केलं. या घटनेला आता 62 वर्षे झाली. त्यानंतर त्यांनी सतत रंगभूमीची आणि अधूनमधून चित्रपटसृष्टीचीसुद्धा सेवा केलेली आहे. त्या राज्यनाट्य स्पर्धेत आणि कामगार कल्याण केंद्रातर्फे होणाऱ्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाची पारितोषिकं पटकावलेल्या कलावती आहेत. जुन्या संगीत नाटकातून आणि नव्या सामाजिक नाटकातूनही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केलेल्या आहेत. अशा अभिनेत्रीची कारकीर्द “साठवण’ या सदरात नक्‍कीच साठवून ठेवायला हवी असं मला प्रामाणिक आणि ठामपणेसुद्धा वाटतं. या अभिनेत्रीनं “सं. सौभद्र’ या नाटकात रूक्‍मिणीची भूमिका केलेली आहे, तर “सं. संशय कल्लोळ’ या नाटकात त्यांनी कृतिका साकारली आहे. “सं. भावबंधन’ या राम गणेश गडकरी यांच्या नाटकात तर त्यांनी लतिका ही नायिका आणि मालती ही सहनायिका अशा दोन भूमिका सादर केलेल्या आहेत. “सं. शारदा’ या नाटकात त्या शारदेच्या मैत्रिणीची भूमिका आजही करतात आणि राम गणेश गडकरी यांच्याच “एकच प्याला’ या अजरामर नाटकात त्यांनी सिंधू ही नायिका आणि तळीरामाची पत्नी गीता अशाही दोन भूमिका करून त्या काळातल्या प्रेक्षकांची वाहवा मिळवलेली आहे. ही सारी मंडळी खरोखरीच साठवण करून ठेवावीत अशीच आहेत हो!
(क्रमशः)

डॉ. विश्‍वास मेहेंदळे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.