नगर -करोना महामारीच्या काळात हातावर पोट असलेल्या विडी कामगारांचा रोजगार बुडाला असून, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कामगारांना शासनाने जीवन भत्ता दरमहा दोन हजार रुपये द्यावा, तसेच तातडीने 10 हजार अनुदान देण्याची मागणी, राज्य विडी कामगार फेडरेशन, लालबावटा विडी कामगार युनियन व नगर विडी कामगार संघटनेच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली.
यावेळी विडी कामगार नेते शंकर न्यालपेल्ली, ऍड. सुधीर टोकेकर, निर्मला न्यालपेल्ली, भारती न्यालपेल्ली, व्यंकटेश बोगा, दीपक शिरसाठ, तुषार सोनवणे, शंकरराव मंगलारप, भैरवनाथ वाकळे, संगीता कोंडा, सगुना श्रीमल आदी उपस्थित होत्या.
राज्यात 1 लाख 60 हजार विडी कामगार आहेत. त्यापैकी 1 लाख 10 हजार विडी कामगार भविष्य निधीचे सभासद आहेत. लॉकडाऊनकाळात विडी कारखाने बंद होते. हाताला काम नसल्याने विडी कामगारांचा रोजगार बुडाला. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना शासनाने कामगारांना जीवन भत्ता म्हणून दरमहा दोन हजार रुपये देण्यात यावे व तातडीने प्रत्येक कामगारास आर्थिक मदत म्हणून 10 हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.