पुण्यावर पुन्हा ‘केसरियॉं’

पुणे – लोकसभेचा पुण्याचा गढ राखण्यात भाजप यशस्वी झाले असून कॉंग्रेसच्या मोहन जोशी यांचा 3 लाख 24 हजार 005 मतांनी दारूण पराभव करत भाजपचे उमेदवार गिरीश बापट निवडून आले आहेत. एवढेच नव्हे तर भाजपचेच विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्यापेक्षा सुमारे 62 हजार 050 मते जास्त मिळवत त्यांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे, आमदारकीलाही ते कायमच जास्त मताधिक्‍याने निवडून आले आहेत. खासदारकीलाही त्यांचे मताधिक्‍य मागील उमेदवारापेक्षा जास्त आहे.

कॉंग्रेसची एककल्ली सत्ता असल्याचा इतिहास भाजपने पूर्णपणे पुसून टाकला आहे. बापट हे 3 लाख 24 हजार 005 मतांनी निवडून आले. त्यामुळे भाजपच्या गोटात पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. पहिल्या फेरीपासूनच बापटांनी आघाडी सोडली नाही. शेवटच्या फेरीपर्यंत बापटच आघाडीवर राहिले. 21 फेऱ्यांमध्ये संपूर्ण मतमोजणी झाली. एकूण 31 उमेदवार आणि “नोटा’ मिळून 10 लाख 33 हजार 824 मतदान झाले.

विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचे तिकिट कापून विद्यमान पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीच्या अगदी दीड दिवस आधी कॉंग्रेसने मोहन जोशी यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली. त्याचा शेवट बापट यांच्या विजयाने झाला. बापट यांना अंतिमत: 6 लाख 31 हजार 875 मते पडली. तर जोशी यांना 3 लाख 7 हजार 870 मते पडली.

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिली फेरी झाली. त्यावेळी बापट यांना 30,682 मते पडली तर जोशी यांना 14,456 मते पडली. जोशी यांनी मतमोजणीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. पहिली फेरी पूर्ण करून त्याची एकत्रित बेरीज आणि नोंद करून त्या नोंदणीवर आरोची स्वाक्षरी झाल्यानंतरच दुसरी फेरी सुरू करावी, अशी विनंती केली. त्यामुळे दुसरी फेरी सुरू होण्याला बराच वेळ लागला.

त्यातून चुकीच्या पद्धतीने एक “ईव्हीएम’ मशीन उघडल्याने काहीकाळ त्यावर मतदानाची आकडेवारीच दिसली नाही. परंतु, तज्ज्ञांना बोलावून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नवलकिशोर राम यांनी हा प्रश्‍न सोडवला. काही मशीन्स लॉक झाल्याबाबतही आक्षेप घेण्यात आले मात्र, तेथे जागेवर प्रश्‍न सोडवण्यात आले.

फेरी आणि मताधिक्‍य
पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत 30 हजाराचे मताधिक्‍य मिळवल्यानंतर तिसऱ्या फेरीत ते कमी झाले. चौथ्या फेरी अखेर 1 लाखाचे मताधिक्‍य बापट यांनी ओलांडले तर जोशी यांनी 54 हजारांपर्यंत मजल मारली. सहाव्या फेरीअखेर बापट यांनी पावणेदोन लाखांचे मताधिक्‍य ओलांडले तर जोशी 80 हजारापर्यंत पोहोचले. सातव्या फेरीत बापट यांनी 2 लाखांचा पल्ला ओलांडला. परंतु, जोशी यांना 1 लाखाच्या आत मते पडली. आठव्या फेरी अखेर मात्र जोशी यांनी 1 लाखाचा टप्पा गाठला, त्यावेळी बापट अडीच लाखांपर्यंत पोहोचले होते. नवव्या फेरीत जोशी सव्वालाख मतांपर्यंत पोहोचले तर बापट यांनी सव्वातीन लाख मतांचा टप्पा पार केला. अकराव्या फेरीमध्ये बापट यांनी जवळपास सव्वातीन लाख मतांचा टप्पा गाठला. जोशी यांना 1,58,327 मते पडली.

“ईव्हीएम’नंतर “व्हीव्हीपॅट’ चिठ्ठ्यांची मोजणी
“ईव्हीएम’ मशीनवरील मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर “व्हीव्हीपॅट’ मशीनमधील चिठ्ठ्यांची मोजणी होणार आहे. एका लोकसभा मतदार संघात तीस मशीन्सवरीलच चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात येणार आहे. एका लोकसभा मतदार संघात असलेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय चिठ्ठ्या करण्यात येणार आहेत. त्यातील पाच चिठ्ठ्या काढून तेवढ्यांचीच मोजणी करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेला रात्री एक-दोन वाजण्याची शक्‍यता असल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)