रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज आठवा दिवस आहे. रशियाकडून अजूनही युक्रेनवर जोरदार हल्ले सुरू आहेत. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने रशियन सैन्याला युक्रेनमधून माघार घेण्याचा ठराव मंजूर केला आहे. याशिवाय युक्रेनमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान युक्रेनच्या मदतीला जर्मनी धावून आला असल्याची माहिती समोर आली आहे.
रशियाने केलेल्या आक्रमक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनला जर्मनीचा पाठिंबा मिळाला आहे. जर्मनी युक्रेनला आणखी 2700 हवाई विरोधी क्षेपणास्त्रे देणार असल्याचे सुत्रांच्या हवाल्याने कळाले आहे.
दरम्यान, युक्रेनवर रशियाने आज युद्धाच्या आठव्या दिवशीही जोरदार हल्ले केले आहेत. खारकीवमध्ये रशियन बॉम्बफेक सुरूच आहे. त्यात लहान मुलांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे.