नवी दिल्ली – वन्य प्राण्यांच्या संवर्धनाबाबत जर्मनीने दिलेल्या अनाहूत सल्ल्यावरून आफ्रिकेतील बोस्तवाना देश संतप्त झाला असून आपल्या देशातील हजारो हत्ती जर्मनीमध्ये सोडण्याची धमकी बोत्सवानाचे अध्यक्ष मक्वत्सी मसिसी यांनी दिली आहे. बोत्सवानामध्ये जगातील सर्वात जास्त हत्ती आहेत. सुमारे २० हजार हत्तींना जर्मनीमध्ये सोडले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
हत्तींना सांभाळण्याच्या मुद्यावरून बोत्सवाना आणि जर्मनीमध्ये या वर्षाच्या प्रारंभापासून वाद सुरू झाले. बोत्सवानामध्ये हत्तींची शिकार होत असल्यावरून जर्मनीच्या पर्यावरण मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली होती. शिकारीवर नियंत्रण आणण्यासाठी हस्तीदंताच्या करंडकच्या आयातीवर बंदी घातली जावी, असे सुचवण्यात आले होते. युरोपीय संघातील जर्मनीमध्ये असा करंडकांची सर्वाधिक आयात केली जाते.
मात्र जर्मनीने ही आयात थांबवल्यास बोत्सवानाचे आर्थिक नुकसान होऊ शकते. हत्तींच्या संवर्धनामुळे बोस्तवानामध्ये हत्तींची पैदास प्रचंड झाली आहे. त्यातून मानव-पशू संघर्षाच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. त्यामुळे हत्तींची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी शिकार हाच एकमेव योग्य पर्याय असल्याचे मसिसी यांनी म्हटले आहे.
बोत्सवानामध्ये २०१४ मध्ये हत्तींच्या शिकारीवर बंदी घातली गेली होती. पण २०१९ मध्ये ही बंदी उठवण्यात आली. आता शिकारीसाठी वार्षिक कोटा पद्धत स्वीकारली गेली आहे.
हत्तींच्या हल्ल्यांच्या घटना वाढू लागल्या आहेत. बर्लिनमध्ये बसून आमच्या समस्यांवर उपाय सुचवणे सोपे आहे. जर्मनीला जर हत्तींना सांभाळणे सोपे वाटत असेल, तर बोत्सवानातील २० हजार हत्ती जर्मनीत सोडले जातील, असे मसिसी म्हणाले.
यापूर्वी बोत्सवानाने ८ हजार हत्ती अंगोलाला आणि ५०० हत्ती मोझंबिकला देण्याची तयारी दाखवली होती. हाच प्रस्ताव जर्मनीपुढे ठेवण्यात आला आहे. ब्रिटनने शिकार केलेल्या पशू अवशेषांच्या स्मृतिचिन्हांच्या आयातीवर बंदी घालण्याची तयारी केली होती. त्याचा निषेध म्हणून मार्च महिन्यात बोत्सवानाने लंडनमधील हायड पार्कला १० हजार हत्ती देण्याची तयारी दाखवली होती.