नगर – भिंगार छावणी परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरु असल्याने मागील चार महिन्यापासून सामन्य रुग्णांची मोठीच हेळसांड सुरु आहे. त्यांच्यासाठी आरोग्यसेवा बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी नागरिकांना खासगी रुग्णालयात जावे लागत असून, तातडीने सदर कोविड सेंटर इतरत्र हलवून नागरिकांना अत्यावश्यक आरोग्यसेवा खुली करुन देण्याची मागणी आरपीआयच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
छावणी परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षक स्नेहा परनाईक यांना देण्यात आले. आरपीआय युवकचे शहराध्यक्ष अमित काळे, सनी खरारे, मंगेश मोकळ, तालेवर गोहेर, गौतम कांबळे, संतोष सारसर, नरेंद्र तांबोली, प्रविण वाघमारे, विशाल कटारनवरे, पूजा आळकुटे, राहुल लख्खन आदिंसह नागरिक उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल हॉस्पिटलमध्ये नागरिकांची सामान्य वैद्यकीय सेवा, आपत्कालीन सेवा, गरोदर माता तपासणी, प्रसूतिगृह व लहान मुलांचे लसीकरण इत्यादी सेवा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोविड सेंटरमुळे बंद आहेत. करोना रुग्णांना सेवा देणे स्वागतार्ह आहे. मात्र, वैद्यकीय सेवा बंद करण्याचा निर्णय नागरिकांच्या हिताचा नाही. वैद्यकिय सेवा बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयात जावे लागत आहे.
त्यासाठी त्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत, असा आरोप उपस्थित कार्यकर्त्यांनी केला. सबब, कोविड सेंटर इतरत्र हलवून भिंगार येथील छावणी परिषद हॉस्पिटल सर्वसामान्य नागरिकांना तातडीने खुले करुन होणारी हेळसांड न थाबविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपस्थितांनी दिला.