Dharavi Slum : भारतीय अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) यांनी मुंबईतील धारावी (Dharavi) झोपडपट्टीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी एक नवीन कंपनी स्थापन केली आहे. एका अहवालानुसार, गौतम अदानी यांची कंपनी अदानी प्रॉपर्टीजने (Adani Properties) मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणासोबत (Mumbai Slum Rehabilitation Authority) हा संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे. आता यातून धारावीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.
610 दशलक्ष डॉलर्सची बोली जिंकली होती –
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गौतम अदानी यांनी आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी भागांपैकी एक असलेल्या धारावीच्या पुनर्विकासासाठी पावले उचलली आहेत. अदानी समूहाने (Adani Group) जुलैमध्ये या प्रकल्पासाठी 610 मिलियन डाॅलर बोली लावून धारावी पुनर्बांधणी प्रकल्प जिंकला. धारावी झोपडपट्टीचा (Dharavi Slum) आकार न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कच्या अंदाजे तीन-चतुर्थांश आहे आणि हॉलीवूड (Hollywood) दिग्दर्शक डॅनी बॉयलच्या 2008 च्या ऑस्कर-विजेत्या चित्रपट स्लमडॉग मिलेनियरमध्ये (Slumdog Millionaire) प्रदर्शित झाला होता.
धारावीत 10 लाख लोक राहतात –
याबाबत सविस्तर माहिती देताना अदानी समूहाच्या प्रवक्त्याने धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड नावाचा संयुक्त उपक्रम स्थापन केल्याची पुष्टी केली आहे. यासोबतच सुमारे 10 लाख लोकांचे वास्तव्य असलेल्या धारावीच्या पुनर्विकासाचे (Redevelopment Of Dharavi) काम अनेक दशकांपासून प्रलंबित असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, हा धारावी प्रकल्प कायदेशीर वादात अडकलेला असताना अदानी समूहाने हे मोठे पाऊल उचलले आहे.
प्रकल्पाबाबत वाद सुरूच –
अदानी समूहाबरोबरच, धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुबईची सेकलिंक टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनने (SecLink Technologies Corporation) देखील बोली लावली होती. सेक्लिंकचा आरोप आहे की महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाची मूळ 2018 बोली प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने रद्द केली, जेणेकरून पुन्हा सुरू करून अदानी समूह बोली जिंकू शकेल. मात्र, महाराष्ट्र सरकार आणि अदानी समूह या दोघांनीही हे आरोप निराधार ठरवून फेटाळून लावले आहेत.
अदानी समूहाचे एकापाठोपाठ एक नवीन सौदे –
अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गच्या अहवालामुळे या वर्षी गौतम अदानी यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते, परंतु यातून सावरुन समूह आता आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे आणि एकामागून एक डील करत आहे. अलीकडे, 20,434 मेगावॅटच्या पोर्टफोलिओसह देशातील सर्वात मोठी अक्षय कंपनी अदानी ग्रीनला (Adani Green) मोठी गुंतवणूक मिळाली आहे. अहवालानुसार, फ्रान्सची टोटल एनर्जी एसई (Total Energy SE) अदानी समूहासोबतच्या संयुक्त उपक्रमांतर्गत अक्षय प्रकल्पात $300 दशलक्ष गुंतवणूक करेल.
पीटीआयच्या वृत्तानुसार, अदानी समूहाने अलीकडेच जपान, तैवान आणि हवाईच्या बाजारपेठांमध्ये ग्रीन हायड्रोजनच्या विक्रीसाठी जपानी समूह कोवा ग्रुपसोबत (Japan Kowa Group) संयुक्त उपक्रमाची घोषणा केली होती. यामध्ये दोन्ही गटांची 50-50 टक्के भागीदारी असेल. भारतात पूर्णत: एकात्मिक ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टमची स्थापना करण्यासाठी अदानी समूह पुढील 10 वर्षांत 50 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.