Ganpat Gaikwad : कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात सुरू असलेला वाद चिघळताना दिसून येत आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार निवडून येईल, असे वक्तव्य केले होते. यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी ‘मनोरंजनाच्या दृष्टीने’ या वक्तव्यांकडे पाहिले पाहिजे’, असे म्हणत गणपत गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे. आता गणपत गायकवाडांनी श्रीकांत शिंदेंवर ‘गद्दार’ म्हणत अप्रत्यक्षपणे सडकून टीका केली आहे.
राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील विजयानंतर गणपत गायकवाडांनी कार्यकर्त्यांबरोबर जल्लोष केल्यानंतर गणपत गायकवाड यांनी, “कल्याण-भिवंडी मतदारसंघात लोकसभेला जे भाजपाचे उमेदवार उभे राहतील, ते निवडून येतील.” असे विधान केले होते.
यावर विधानावर बोलताना श्रीकांत शिंदेंनी म्हटलं, “कोण कुठून लढणार हे ठरविण्यासाठी वरिष्ठ सक्षम आहेत. वक्तव्य केल्याशिवाय प्रसिद्धी मिळणार नाही, हे काहींना माहिती आहे. मनोरंजनाच्या दृष्टीनं या वक्तव्यांकडे पाहिलं पाहिजे. यापूर्वीही अशी वक्तव्ये करण्यात आली होती. पण, ती मागे घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. कुणी टीका केली, तर त्यांच्यावर टीका करण्यास मला वेळ नाही. आपला वेळ जनतेसाठी वापरला पाहिजे.”
श्रीकांत शिंदेंच्या विधानाला गणपत गायकवाडांनी प्रत्युत्तर दिले आहे. ट्विटरवर ट्वीट करत गणपत गायकवाड यांनी, “ज्यांना गद्दारी करून कमी वेळात अमाप पैसा आणि सत्तेच बळ मिळाले आहे. त्यांना त्यांच्या नजरेने सर्व जग विदूषक आहे असा भास होतो.”असे त्यांनी म्हटले आहे.