Sanjay Raut : ठाकरे गटाकडून आणि शिंदे गटाकडून सतत आरोप- प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. राजकीय वर्तुळात सध्या विविध घडामोडी होत असताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. आरोग्य विभागात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या पत्रातून केला आहे. त्यांच्या या पत्राने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
संजय राऊत यांनी पत्रात नेमकं काय लिहिले आहे?
“मुख्यमंत्री महोदय…
‘महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. एकेकाळी आपली आरोग्य सेवा देशात अव्वल होती. आज काय सुरू आहे? आरोग्य अधिकाऱ्यांना आपल्या “बॉस” ला खंडणी द्यावी लागते. पैसा बोलतो. पैसाच काम करतो अशी आपल्या आरोग्य खात्याची भयंकर अवस्था आहे. आरोग्य खाते कात्रजच्या कोंडीत गुदमरत आहे. मुख्यमंत्री महोदय आता काय करणार?’, असा सवाल त्यांनी केला आहे.
‘राज्यातील आरोग्य व्यवस्था व आरोग्य यंत्रणेबाबत कमालीचे गोंधळाचे चित्र निर्माण झाले आहे. जनतेच्या जीवनमरणाशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विभाग आहे, पण अलीकडे आरोग्य मंत्रालय हे भ्रष्टाचाराचे कुरण, अनियमित बदल्या-बढत्यांचा व त्यातून आर्थिक उलाढालीचा विभाग बनला आहे. या विभागात फक्त पैसाच बोलतो व पैसाच काम करतो असे बोलले जाते. यामुळे संपूर्ण खात्यात असंतोष आहे व त्याचा फटका गरीबांना बसत आहे.’
महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. एकेकाळी आपली आरोग्य सेवा देशात अव्वल होती. आज काय सुरू आहे?
आरोग्य अधिकाऱ्यांना आपल्या “बॉस” ला खंडणी द्यावी लागते.पैसा बोलतो.पैसाच काम करतो अशी आपल्या आरोग्य खात्याची भयंकर अवस्था आहे.
आरोग्य खाते कात्रजच्या कोंडीत… pic.twitter.com/VIaEmZI5cQ— Sanjay Raut (@rautsanjay61) December 6, 2023
‘ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण हे सरळ सरळ आरोग्य विभागाशी संबंधित आहे. पोलिसां इतकेच संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारीही त्यास जबाबदार आहेत. माझ्या समोर आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराची, अनियमिततेची प्रकरणे पुराव्यासह आली आहेत व हा सगळाच प्रकार गंभीर तसेच राज्याच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारा आहे. महात्मा ज्योतीराव फुले योजना लागू करण्यासाठी खासगी रुग्णालयं एका बेडसाठी 1 लाख रुपये आकारतात. थोडक्यात या योजनेमध्ये बोगस लाभार्थींची संख्या मोठी असून, खोटी बिलं, खोटे रुग्ण यावरची कोट्वधींची रक्कम संबंधित मंत्र्यांपर्यंत जाते असा दावा राऊतांनी पत्रातून केला आहे.
सध्या आरोग्य विभागात संचालक पदाच्या जागा रिक्त असूनही त्यावर रितसर भरती न करता या जागांचा सौदा करण्याची मंत्र्यांची योजना असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी या पत्रातून करत अनेक प्रकरणं उघडकीस आणली. यात त्यांनी नाशिक, लातूरपासून जळगावपर्यंतचे संदर्भ देत त्यांनी अनेक अधिकाऱ्यांच्या नावांचाही यामध्ये उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं. इतककेच काय तर संजय राऊत यांनी यासाठी जबाबदारी घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याचे नाव कळवावे जेणेकरून काही पुरावे सुपूर्त करता येईल, असेही लिहिले आहे. आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी ही मागणी राऊतांनी या पत्राद्वारे लावून धरली आहे.