पिंपरी – महाकाली टोळीतील कुख्यात गुंड व सराईत फरार गुन्हेगाराला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून गावठी बनावटीचे चार पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त केली आहेत. सागर कुमार इंद्रा (वय 25, रा. देहूगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक आतिक शेख यांना सागरबाबत मिळालेल्या माहितीनुसार हिंजवडी पोलिसांनी दोन टीम तयार केल्या. घोटावडेकडून येणाऱ्या वाहनांची कसून टेहाळणी पोलिसांनी सुरु केली.
सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास सागर आला, पोलिसांनी त्याला ओळखले आणि त्याचा मोटार सायकलवरून पाठलाग सुरु केला. आरोपी मेगा पोलीस चौकाजवळ सिगारेट पिण्यासाठी थांबला. त्यावेळी पोलिसांनी पान टपरीला वेढा देत त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये दोन गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. त्यानंतर त्याला अटक करून कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या घरात आणखी दोन पिस्टल आणि दोन काडतुसे ठेवल्याचे सांगितले.
पोलिसांनी एकूण चार पिस्टल, चार जिवंत काडतुसे, एक मोटारसायकल, बॅग असा एकूण एक लाख 50 हजार 850 रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपी सागर हा महाकाली टोळीचा सदस्य आहे. त्याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात पाच, देहूरोड पोलीस ठाण्यात तीन, पिंपरी पोलीस ठाण्यात दोन, वाकड, निगडी, चिंचवड, हडपसर, पुणे रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी एक असे एकूण 15 गंभीर गुन्हे दाखल आहेत. हडपसर पोलीस ठाण्यातील खुनाच्या आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील अपहरणाच्या गुन्ह्यात सागर फरार होता.