तहसील कार्यालयात प्रशासन गतिमान व्हावे

– संतोष वळसे पाटील

तहसील कार्यालयातील प्रशासन गतीमान नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कागदपत्रांची पूर्तता करुनही त्वरित कार्यवाही होत नसल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. दोन महिन्यांपूर्वी तहसीलदार सुषमा पैकेकरी यांना लाचलुचपत खात्याने रंगेहात पकडले होते, परंतु त्यानंतरही आर्थिक व्यवहार केल्याशिवाय कामे होत नसल्याचा अनुभव नागरिक उघडपणे बोलून दाखवत आहेत.

रमा जोशी यांनी तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारुन आठवडा झाला आहे. त्यांची काम करण्याची पद्धत निर्ढावलेल्या कर्मचाऱ्यांना रुचेल काय? याबाबत शंका आहे. आंबेगाव तहसील कार्यालय आणि त्यांच्या अंतर्गत येणारे महसुलचे कर्मचारी यांना कामकाजाची शिस्त लावणे गरजेचे आहे. किरकोळ कामांसाठी हेलपाटे मारावयास लावले जात आहेत. ऑनलाईन सातबाऱ्यामध्ये नावांमध्ये चुका, वारसांमध्ये चुकीची नावे, पुरवठा विभागातील रेशनिंगकार्ड नवीन देणे, इतर दुरुस्त्या, कुळकायदा शाखेसह इतर कामे तसेच महसूल विभागाशी निगडीत असणारी इतर कामांचा निपटारा वेळेत होत नाही.

किरकोळ कारणांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. वर्षांनुवर्ष प्रलंबित कामे होत नसल्यामुळे एजंटांना हाताशी धरावे लागत आहे. तहसील कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी वेळेत कार्यालयात येत नाहीत. तसेच आल्यावर मोबाइलवर गप्पा मारताना दिसतात. चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये जातात. तसेच कार्यालयात आल्यानंतर किरकोळ काम करुन जेवणासाठी जातात. त्यानंतर मिटींग आहे, कागदपत्रांची माहिती वरिष्ठांना द्यायची असल्यामुळे तुम्ही नंतर या असे सांगून अपेक्षेने कामासाठी आलेल्या बिचाऱ्या नागरिकांची पद्धतशीरपणे बोळवण केली जात आहे.

नागरिकांना प्रत्येकवेळी वेगवेगळी कागदपत्रे आणावयास सांगून हैराण केले जाते. त्यामुळे नागरिकही एजंटांना कामे सांगून कटकट नको म्हणून निर्धास्त होतात. तहसीलदार रमा जोशी यांनी तहसील कार्यालयातील अनागोंदी कारभार नियंत्रित करण्यासाठी कडक धोरण राबवावे. कामकाजास शिस्त लावण्यासाठी काही कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच एजंटांशिवाय पारदर्शक तहसील कार्यालयाचा कारभार व्हावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.