शिक्रापूर – वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील शंभूनगरी सोसायटीमध्ये राहणारे कुटुंब बाहेरगावी गेलेले असताना अज्ञाताने त्यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा उचकटून सिलिंडर, लॅपटॉप, दागिन्यांसह इतर किमती ऐवज लंपास केला. शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने दोन दिवसांत आरोपींना गजाआड केले.
विवेक विनोद पाटील (रा. शीरसाड, ता. अमळनेर, जि. जळगाव, सध्या रा. दहीवद, ता. शिरपूर, जि. धुळे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर योगेश सपकाळे (रा. शंभूनगरी, वढू बुद्रुक, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली होती.
वढू बुद्रुक येथील शंभूनगरी सोसायटीमध्ये राहणारे योगेश सपकाळे हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेलेले होते. आठ दिवसांनी ते घरी आले असताना त्यांना कपाटाचा दरवाजा आणि घराच्या पाठीमागील दरवाजा उचकटलेला दिसल्याने त्यांनी घरात पाहणी केली.
त्यावेळी सिलेंडर, लॅपटॉप, चांदीच्या धातूची देवाची मूर्ती, कपाटातील वीस हजार रुपये व काही सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी थेट शिक्रापूर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. शिक्रापूर पोलिसांनी आरोपीवर चोरीचा गुन्हा दाखल केला तर तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करीत असताना परिसरात काही काळ आलेल्या विवेक पाटील याने चोरी केलेली आहे. तो धुळे जिल्ह्यात गेल्याची माहिती मिळाली.
त्यांनतर अविनाश थोरात, पोलीस हवालदार सचिन मोरे, अमित देशमुख, किशोर शिवणकर यांनी धुळे येथे जात शिरपूर येथून शिताफीने संशयित आरोपी विवेक पाटीलला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे चौकशी केली असताना त्याने चोरी केल्याचे कबूल करीत चोरी केलेला मुद्देमाल दिला. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात करीत आहेत.