नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज “जी-20’च्या निमित्ताने आलेल्या विविध देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली.
जी-20 परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी मॉरीशसला “अतिथी देश’ म्हणून विशेष आमंत्रण दिल्याबद्दल पंतप्रधान जुगनाथ यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
भारताच्या जी 20 अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कृतिगटांच्या तसेच मंत्रीस्तरीय बैठकांमध्ये मॉरीशसने दर्शवलेल्या सक्रिय सहभागाची पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली.
भारत आणि मॉरीशस यांच्यातील राजकीय संबंधांना यावर्षी 75 वर्षे पूर्ण होत असतानाच, जी-20 शिखर परिषदेच्या विविध उपक्रमांचे आयोजन होत आहे याबद्दल दोन्ही नेत्यांनी आनंद व्यक्त केला.
दोन्ही देशांदरम्यान 30 हून अधिक शिष्टमंडळ स्तरीय दौरे आणि 23 द्विपक्षीय करारांवर झालेल्या स्वाक्षऱ्या यांसह गेल्या वर्षभरात भारत आणि मॉरीशस यांच्यातील द्विपक्षीय घडामोडी आणखी वेगवान झाल्या आहेत याची नोंद या नेत्यांनी घेतली.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. भारत-बांग्लादेश द्विपक्षीय सहकार्यामध्ये वैविध्य आणण्याबाबत पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी फलदायी चर्चा केली.
कनेक्टिव्हिटी, संस्कृती तसेच दोन्ही देशांमधील लोकांमधील संबंध यासह अनेक क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असल्याचे पंतप्रधानांनी “एक्स’वरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.