नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरच्या मेंढरजवळ बालाकोट सेक्टरमधील नियंत्रण रेषेच्या पुढील भागातून शुक्रवारी सीमा सुरक्षा दलाचा अर्थात बीएसएफचा एक जवान बेपत्ता झाला आहे. यानंतर बीएसएफने परिसरात शोधमोहीम सुरू केली, मात्र, रात्री उशिरापर्यंत या जवानाबाबत काहीही मिळाले नाही. बेपत्ता झालेल्या जवानाचे नाव अमित अशोक पासवान असून तो बीएसएफच्या 79 व्या बटालियनचे कॉन्स्टेबल आहे. पासवान बिहारचा रहिवासी आहे.
दुसरीकडे, याप्रकरणी बीएसएफकडून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाकोट सेक्टरच्या फॉरवर्ड भागात तैनात असलेले बीएसएफ कॉन्स्टेबल अमित पासवान ड्युटीवर जात असताना बेपत्ता झाले. यानंतर बीएसएफने शोधमोहीम सुरू केली.
रात्री उशिरा, बीएसएफ 79 व्या बटालियनने बालाकोट पोलीस चौकीत कॉन्स्टेबल अमित पासवान बेपत्ता झाल्याची लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी जोरदार शोधमोहीम सुरू आहे. मात्र, लष्कराने अधिकृतरित्या घटनेला दुजोरा दिलेला नाही.