नवी दिल्ली -सार्वजनिक इंधन कंपन्यांनी शुक्रवारी लिटरमागे पेट्रोलच्या दरात 29 पैशांची, तर डिझेलच्या दरात 28 पैशांची वाढ केली. विशेष म्हणजे, कॉंग्रेसने इंधनांच्या वाढत्या किमतीविरोधात देशव्यापी निदर्शने केल्याच्या दिवशीही दरवाढीचे सत्र कायम राहिले.
सार्वजनिक कंपन्यांनी 18 दिवसांच्या खंडानंतर मागील महिन्यात (4 मे) पहिल्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ केली. तेव्हापासून आतापर्यंत ती इंधने 22 वेळा महागली. त्यामुळे मागील महिन्यापासून आतापर्यंत पेट्रोल 5.45 रूपयांनी, तर डिझेल 6.02 रूपयांनी महागले.
दरवाढीच्या सत्रामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पेट्रोलचे दर याआधीच 100 रूपयांवर गेले आहेत. राजस्थानात पेट्रोल आणि डिझेलचे दर देशात सर्वांधिक आहेत. त्या राज्याच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात पेट्रोल प्रतिलिटर 106 रूपये 94 पैशांना विकले जात आहे. तर, डिझेलचा दर 99 रूपये 80 पैशांवर पोहचला आहे. त्यामुळे राजस्थानात आता डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर जाऊन ठेपले आहे. इंधन दरवाढीच्या सत्रामुळे विरोधक मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत.