दिल्ली – लॉकडाऊन, करोनामुळे आधीच जगासह देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यात रशिया आणि युक्रेन युद्धामुळे यात भर पडली असून महागाईने सर्वच देशातील नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसेंदिवस इंधन दरवाढही सुरूच आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होतो. महागाईचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होत असल्याने केंद्रासह राज्यांनी यापूर्वी इंधनावरील करात कपात केली. मात्र, याचा परिणाम फारसा दिसून आलेला नाही. त्यामुळे आता पुन्हा करात कपात करण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. मात्र, या इंधन दरवाढीवरून केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला घरातूनच विरोधाचा सामना करावा लागत आहे.
उत्तर प्रदेशमधील पिलिभीत लोकसभा मतदार संघातील भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी इंधन दरवाढीवरून पुन्हा मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. नुकत्याच वाढलेल्या एलपीजी दरवाढीचे खापर केंद्र सरकारवर फोडले आहे. गेल्या काही दिवसांपासून वेळोवेळी ते सर्वसामान्यांच्या विषयांवरून मोदी सरकारच्या धोरणांविरुद्ध आवाज उठवताना दिसून येत आहेत. त्यांनी ट्विट करत पुन्हा मोदी सरकारचा समाचार घेतला असून त्यात त्यांनी “चुलीत लाकडे जळत आहेत, आणि घरगुती गॅस सिलिंडर शोभेची वस्तू बनली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गॅसच्या पासबुकमध्येही कोणतीच नोंद झालेली नाहीये. तसेच, सत्तेत येण्यापूर्वी आपण लाखो महिलांना जे धुरातून मुक्तीचे वचन दिले होते, ते दु:ख आजही कायम आहे”, असे म्हटले आहे.
पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारकडून गरीब कुटुंबांना उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले होते. या योजनेंतर्गत चूल आणि धुरातून महिलांची सुटका करण्याचे स्वप्न दाखवले होता. मात्र, वाढत्या गॅस सिलिंडरच्या किंमतीमुळे त्यांना पुन्हा चूल आणि लाकूड यांचा वापर करावा लागत आहे.
घरेलू सिलेंडर अब 1050 रु में मिलेगा!
जब देश में बेरोजगारी चरम पर है तब भारतवासी पूरी दुनिया में सबसे महँगी LPG खरीद रहे हैं।
कनेक्शन कॉस्ट 1450 रु से बढ़ाकर 2200 रु, सिक्योरिटी 2900 से बढ़ाकर 4400, यहाँ तक की रेगुलेटर तक 100 रु महँगा है।
गरीब की रसोई फिर धुएँ से भरने लगी है।
— Varun Gandhi (@varungandhi80) July 6, 2022
यापूर्वीदेखील खासदार वरूण गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली होती. यात त्यांनी “घरगुती गॅस सिलिंडरचे दर 1050 झाले आहेत. जेथे देशात बेरोजगारी वाढत आहे. जगात सगळ्यात महाग घरगुती गॅस सिलिंडर भारतात विकले जात आहे. कनेक्शन कॉस्ट 1450 वरून 2200 झाली आहे. सिक्योरिटी डिपॉझीट 2900 वरून 4400 वर जावून पोहोचले आहे. रेग्युलेटरचेही दर 100 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव गरिबांना पुन्हा चुलीचा वापर करावा लागत आहे”, असे म्हटले होते.