माझ्याशी नव्हे, ‘त्या’ तेंडुलकरशी बोलल्या असाव्यात; सचिन पायलट यांंचं भाजपप्रवेशाच्या चर्चेला उत्तर

जयपूर, -भाजप नेत्या रिटा बहुगुणा-जोशी माझ्याशी नव्हे; क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरशी बोलल्या असाव्यात, अशी शाब्दिक टोलेबाजी करून कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी संभाव्य भाजप प्रवेशाबाबतचा दावा फेटाळून लावला.

पायलट यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत माझे त्यांच्याशी बोलणे झाले असल्याचा दावा जोशी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. त्यामुळे राजकीय सनसनाटी निर्माण झाल्याने पत्रकारांनी पायलट यांना गाठले. त्यावेळी मिश्‍कील प्रतिक्रिया पायलट यांनी दिली.

जोशी यांनी सचिनशी बोलल्याचा दावा केला असला तरी तो मी नव्हेच अशी भूमिका पायलट यांनी घेतली. माझ्याशी बोलण्याचे धाडस जोशींमध्ये नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. कॉंग्रेस नेते जितीन प्रसाद यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यानंतर पायलट त्याच वाटेने जाण्याचे अंदाज वर्तवणाऱ्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. पायलट यांचे समर्थक असणाऱ्या राजस्थानमधील आमदारांच्या गोटातून पुन्हा नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर, जोशी यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, पायलट यांनी तूर्त तरी भाजप प्रवेशाचा इन्कार केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.