लोणी काळभोरच्या प्रवीण मडखांबेसह तिघांना बेड्या
उरुळी कांचन – आळंदी म्हातोबाची गावच्या डोंगरात आठ दिवसांपूर्वी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची जमिनीखालील पाइपलाइन फोडून त्यातून इंधन चोरी करणाऱ्या लोणी काळभोरच्या इंधनमाफिया प्रवीण मडखांबे व त्याच्या दोन सहकाऱ्यांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली.
प्रविण सिद्राम मडीखांबे (वय 51 रा. फ्लॅट नं. 9, श्री संतोषी बिल्डींग, संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली) या पूर्व हवेलीमधील बड्या इंधन माफियासह विशाल धानाजी धायगुडे (वय 31), बाळू अरुण चौरे (वय 30, दोघेही सिद्राममळा, लोणी काळभोर, ता. हवेली) या तिघांना अटक केली आहे. या तिघांना मंगळवारी (दि. 1) न्यायालयात हजर केले असता आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट पूर्व हवेलीमधील बडा इंधनमाफिया प्रवीण मडखांबेला अटक केल्याने, लोणी काळभोर व परीसरातील इंधन माफियात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत या व्यवसायातील आणखी काही ‘बडे मासे’ हाती लागण्याची शक्यता असून,
पोलिसांनी तशा हालचालीही सुरु केल्या आहेत. दरम्यान आळंदी म्हातोबाची हद्दीतील डोंगरात 25 जुलैला हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची जमिनीखालील पाइपलाइन फोडून त्यातून इंधन चोरी करणाचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले होते.
मुंबईहून सातारा, सोलापूरसह इतर जिल्ह्यातील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या तेल डेपोंना जमिनीखालील पाइपलाइनमधून पेट्रोल-डिझेलचा पुरवठा केला जातो. ही पाइपलाइन आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) हद्दीतील निर्जन डोंगरात मंगळवारी (दि. 25) मध्यरात्री सुमारास फोडून, त्यातून इंधन चोरीचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे व्यवस्थापक गौरव केमचंद गुप्ता (वय 32) यांनी लोणी काळभोर पोलिसात तक्रार दिली होती.
आणखी मासे जाळ्यात अडकणार का?
इंधन चोरीच्या काळ्या साम्राज्यातील आणखी काही मासे जाळ्यात अडकणार का? याकडे लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आळंदी म्हातोबाची इंधन चोरी प्रकरणात ताब्यात घेतलेल्या प्रविण मंडखांबेवर यापूर्वीही इंधन चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. प्रविण हा चार महिन्यांपूर्वी अशाच एका प्रकरणात तुरुंगात गेला होता. तो इंधन चोरीच्या रॅकेटमधील म्होरक्या असून, त्याचे अनेक साथीदार लोणी काळभोर व परिसरात मागील दहा ते बारा वर्षांपासुन राजरोसपणे इंधन चोरी करत आहेत. लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची मागील कारकीर्द पाहता याही प्रकरणात चव्हाण इंधन चोरीच्या तळाशी जाऊन तपास करण्याची शक्यता आहे.
इंधनमाफियांना मोक्का लागणार का?
लोणी काळभोर व आसपासच्या गावात दहा ते बारा मोठे इंधनमाफिया मागील दहा ते बारा वर्षांपासून राजरोसपणे इंधन चोरी करत आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक विविध गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी मागील गुन्हाच्या वेळीही प्रवीण मडखांबे व त्याच्या सहकाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र काही कारणामुळे मागील वेळी न झालेली मोक्काची कारवाई यावेळी तरी होणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.